सोलापूर – शीख धर्मियांचे श्रद्धास्थान धर्मगुरू श्री गुरुनानक देवजी यांचा ५५६ वा जयंती सोहळा (गुरू प्रकाश पर्व) आंत्रोळीकरनगर येथील गुरुद्वारामध्ये किर्तन प्रवचन आणि सत्संगाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शीख धर्मियांचे धर्मगुरू श्रद्धास्थान असणारे श्रीगुरुनानक देवजी महाराजांचा जन्मोत्सव प्रकाशपर्व म्हणून साजरा केला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून गुरुद्वारामध्ये किर्तन प्रवचन आणि सत्संग असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. या प्रवचन आणि कीर्तन सोहळ्यासाठी पंजाबमधून श्रेष्ठ कीर्तनकार सोलापूरच्या गुरुद्वारामध्ये दाखल झाले होते.
दरम्यान, गेल्या आठ दिवसापासून पहाटे आणि रात्री विविध कीर्तन संपन्न झाले. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री तसेच पहाटे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होऊन श्री गुरुनानक देवजी यांचा प्रकाशपर्व साजरा करण्यात आला. पहाटे अनेक शीख आणि सिंधी समाज बांधव देवजींच्या दर्शनाला उपस्थित झाले होते. याप्रसंगी अबालवृद्ध भाविकांनी माथा टेकून श्रींचे दर्शन घेतले. छोट्या भक्तांनी सुद्धा संगीताच्या माध्यमातून सेवा दिली.
यंदाचा प्रकाशपर्व हा ५५६ वा आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण दिसून आले. दर्शन झाल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर काही भाविकांनी लंगर सेवा देखील अर्पण केल्याचे दिसून आले. श्रीगुरुनानक देवजींच्या जयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारामध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या रक्तदान शिबिरास भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी गुरुद्वारा मधील सारे वातावरण भक्तीभावाचे दिसून आले.
श्री गुरुनानक देवजी यांच्या प्रकाशपर्व सोहळ्यात धार्मिक कार्यक्रम संपन्न
श्री गुरूनानक देवजी यांचा ५५६ वा प्रकाशपर्व सोहळ्यात
वीर हरभजन सिंघ संचालक, साहिबजादा जुझार सिंघ, गुरमत मिशनरी कॉलेज रूपनगर-पंजाब, मधुर बैन कीर्तन जत्था (गुरप्रसादि विद्यालय) उल्हासनगर, भाई हरदीप सिंघ (दीप) (हजूर साहिब नांदेड़ वाले) यांचे प्रवचन आणि कीर्तन हे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर भाविकांनी लंगरचा आस्वाद घेतला. तर दि.५ नोव्हेंबर रोजी श्री गुरू ग्रंथ साहिब जी पाठ की समाप्ती होऊन सत्संग संपन्न झाले.
– अमर सचदेव, गुरुद्वारा सेवक




















