अकलूज – इचलकरंजी कोल्हापूरचा मल्ल श्रीमंत भोसले याने पुण्याचा मल्ल राहुल सुळ याच्यावर गुणांनी मात करीत विजय प्राप्त केला. विजेता व उपविजेता मल्लास रोख रुपये ५१ हजार बक्षीस देण्यात आले.
महाशिवरात्री यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर यांच्यावतीने शिवतीर्थ आखाड्यात जंगी कुस्त्याचे भव्य मैदान आयोजित केले होते. या मैदानात मल्ल श्रीमंत भोसले व मल्ल राहुल सूळ यांच्यात अंतिम कुस्ती झाली. सुरुवातीला दोघांनी वीस मिनिटे एकमेकाची ताकद आजमावली. यानंतर पंचांनी त्यांना गुणावर कुस्ती साठी पाच मिनिटांचा वेळ दिला.या मध्ये प्रथम गुण प्राप्त करणाऱ्या मल्ल श्रीमंत भोसले यास विजेते घोषित करण्यात आले.
या कुस्त्यांच्या मैदानाचे उद्घाटन दुपारी ३ वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, समितीचे कार्याध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील व आखाडा प्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील प्रमुख उपस्थित होते.
या आखाड्यात २०० निकाली कुस्त्या झाल्या. या मैदानात हर्षवर्धन गुरव पाणीव याने गजानन चव्हाण गारअकोले यावर मात केली. रणजीत पवार नातेपुते यांने दादा कोकाटे माळशिरस यावर मात केली. मैदानात अनेक चुरशीच्या लढती प्रेक्षकांना पहावयास मिळाल्या.
या वेळी सहकार महर्षी कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने देशमुख, रावसाहेब मगर,वसंत जाधव, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, संचालक सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विराज निंबाळकर, अमरदीप काळकुटे, रामचंद्र ठवरे, प्रकाशराव पाटील, सुरेश मेहेर, शिवाजी सिद, भीमराव काळे, महादेव घाडगे, केशव ताटे देशमुख, दत्ता मगर यांच्यासह असंख्य कुस्ती शौकीन उपस्थित होते.

























