सोलापूर – संपूर्ण पद्मशाली समाजाचा एकमेव आंरराष्ट्रीय पुरोहित म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास जिल्ला पंतुलू यांनी अत्यंत लहान वयातच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय, विलक्षण कार्य केले आहे. वयाच्या अवघ्या १६ ते १८ वर्षांच्या दरम्यान त्यांनी साऊथ आफ्रिका येथील मोनोरिया देशात ‘गीता मंदिरात’ दोन वर्षे हिंदू धर्म प्रसार व पौरोहित्य सेवेचे कार्य केले. या काळात त्यांनी ३८५ नागरिकांना हिंदू धर्माची दीक्षा देऊन समाजात मोठे योगदान दिल्याने त्यांचा विविध सामाजिक संघटनांकडून सत्कार करण्यात आला.
धर्मप्रसाराबरोबरच श्रीनिवास यांनी दशमा विद्या, यंत्र-तंत्र, मंत्र, पौरोहित्य, धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र यांचा सखोल अभ्यास करून वयाच्या अठराव्या वर्षीच या सर्व विद्यांमध्ये प्रावीण्य संपादन केले आहे. त्यामुळे ते धर्म, शास्त्र आणि अध्यात्म क्षेत्रातील तरुण तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
जिल्ला पंतुलू परिवाराचा हा पाचव्या पिढीचा वारसा असून, अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतुलू हे श्रीनिवास यांचे सुपुत्र आहेत. सोलापुरात त्यांच्या आगमनानंतर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचा भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.
या स्वागत सोहळ्यात संभाजी आरमार तर्फे संस्थापक श्रीकांत बापू डांगे, शिवाजी तात्या वाघमोडे, सोलापूर अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे संजय साळुंखे, पद्मशाली समाजाचे शिवराज दासी, सूर्यकांत जिंदम, अमर एक्कलदेवी, राज कांबळे, अविनाश बालयोगी, मोची समाजाचे मोहन जंगम, तसेच नीलगार समाजाचे कालिदास काळपगार, अरविंद जिल्हा, गिरोपा गणपा यांनी सहभाग घेत वाजंत्रीसह भव्य स्वागत केले.
अटकेपार धर्माचा झेंडा फडकवल्याबद्दल जिल्हा पंतुलू परिवाराचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. त्यांच्या या कार्यामुळे केवळ पद्मशाली समाजच नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाचा अभिमान वाढला आहे.


















