तभा फ्लॅश न्यूज/माहूर : लोकसेवक मुद्रांक विक्रेत्याकडून 100/- रुपयांचे मुद्रांक बॉण्ड पेपर) खरेदीसाठी गेलेल्या एका ग्राहकाला सदरील लोकसेवक यांनी 100/- रुपयांचे मुद्रांक (बॉण्ड पेपर) हे चक्क 120/- रुपयास विक्री करणे हे चांगलेच भोवले असून,20 रुपये जादा आकारणी झालेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरून तक्रारीची पडताळणी करत 12 ऑगस्ट रोजी माहूर तहसील कार्यालयाच्या गेटसमोर सापळा कारवाई रचून अमृत श्रीरंग जगताप नावाच्या सदरील मुद्रांक विक्रेत्याला नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
माहूर येथील लोकसेवक मुद्रांक विक्रेता विरोधात 100/- रुपयाचे मुद्रांक (बॉण्ड पेपर) 120/- रुपयात म्हणजेच 20 रुपये जादा आकारणी करण्यात येऊन विक्री केल्याची तक्रार तक्रारदाराने नांदेड युनिट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.तक्रारीची पडताळणी करत सदरील मुद्रांक विक्रेता विरोधात यशस्वी सापळा कार्यवाही करण्यात आली.
यातील प्रकरणातील तक्रारदार हे नमूद लोकसेवक यांचेकडून 100/- रूपयाचे मुद्रांक(बॉण्ड पेपर) खरेदीसाठी गेले होते. तेव्हा यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांना 100/- रूपयाचे मुद्रांक (बॉण्ड पेपर) हे 120/- रूपयास विक्री केले होते.तेंव्हा तक्रारदार यांनी लोकसेवक यांना अधिकचे 20/- रूपये कशाचे अशी विचारणा केली असता लोकसेवक तक्रारदार यांना म्हणाले की ते ईतर व्यक्तींकडून 130/- रूपये घेतात परंतु तुमच्याकडून (तक्रारदाराजवळून) फक्त 120 रूपये घेतले आहे. त्यावेळी तक्रारदार यांना कामाची गरबड असल्यामुळे तक्रारदार यांनी नाईलाजास्तव 100/- रूपये किंमतीचे मुद्रांक 120/- रुपयास खरेदी केले.
तक्रारदार यांना शेतकरी आत्मा बचतगट करीता 100/- रूपये दराच्या 10 मुद्रांकाची(बॉण्ड पेपरची) गरज होती. मुद्रांक विक्रेता अमृत जगताप हा प्रत्येक मुद्रांकाच्या पाठीमागे 20 रूपये अतिरिक्त असे एकूण 10 मुद्रांका करीता 200/- रूपये घेतल्याशिवाय मुद्रांक देणार नाही व मुद्रांक विक्रेता घेत असलेली अतिरिक्त रक्कम 200/- रूपये हा गैरफायदा/ अन्यायाची प्राप्ती असून, ती देण्याची तक्रारदार यांना मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे सदर बाबत लेखी तक्रार दिली होती.
यावरून सदर तक्रारीच्या अनुषंगाने शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली असता यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांना 100/- रू दराचे 10 मुद्रांक देण्याकरीता नियमा प्रमाणे 1000/- रूपयांऐवजी 1,200/- रूपयांची मागणी केली. नमुद रकमे मध्ये लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 200/- रूपयाच्या गैरफायद्याची मागणी करून तडजोडअंती 150/- रूपये गैरफायद्याची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
माहूर तहसिल कार्यालयाच्या गेट समोर सापळा कारवाईचे आयोजन केले असता यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांना 100/- रू दराचे 10 मुद्रांक (बॉण्ड पेपर) देण्याकरीता तक्रारदार यांचेकडून 1150/- रूपये स्वीकारले. त्यामध्ये 100/रुपये दराच्या 10 मुद्रांकाची एकूण किंमत 1000/- रूपये व गैरफायद्याची रक्कम 150/- रूपये अशी रक्कम पंचासमक्ष स्वीकारलेली आहे. अंगझडतीत आरोपी लोकसेवक यांचेकडे रोख 4,200/- रूपये व एक मोबाईल ओप्पो कंपनीचा असा गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे.
यातील आरोपी यांचे आबासाहेब पारवेकर नगर, पांडवलेणी रोड, माहूर येथील राहते घराची घरझडती प्रक्रिया सुरू होती. अमृत श्रीरंग जगताप, मुद्रांक विक्रेता यांचे विरूध्द पोलीस स्टेशन माहूर येथे भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात प्रक्रिया सुरू असून, आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.
सदरील यशस्वी सापळा कारवाई संदीप पालवे,पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड परिक्षेत्र, नांदेड.,डॉ.संजय तुंगार,अपर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड परिक्षेत्र, नांदेड.,पर्यवेक्षण अधिकारी प्रशांत पवार,
पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नांदेड. या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा तपास अधिकारी अर्चना करपुडे,पोलीस निरीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड. यांनी सापळा पथक पोहेकाॅ संतोश वच्चेवार,पोकाॅ ईश्वर जाधव,शिवानंद रापतवार, चापोहेकाॅ रमेश नामपल्ले सर्व ने.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड यांच्या मदतीने पार पाडली आहे.