सोलापूर – सततच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी उत्पादन घटले आहे. सध्या सोयाबीनची काढणी सुरु आहे. सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी मार्केटमध्ये घेऊन येत आहेत. सोयाबीचा हमीभाव ५,३२८ रुपये असताना व्यापारी ३,५०० ते ३,८०० रुपयांनी खरेदी करत आहेत. त्यामुळे सध्या बाजारात हमी भावापेक्षा तब्बल १२०० ते १८०० रुपयांनी कमी दराने सोयाबीन खरेदी केले जात आहे. शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्च एवढेही उत्पन राहत नाही. बियाणे, खत, मजूदरी आणि औषधणीचा खर्च भागवने कठीण झाले आहे. हमीभावा पेक्षा कमी दराने विकल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे या लुटीला पायबंद घालण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या खरेदीसाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे सुरु करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे यांनी केली आहे.
याबाबत प्रशासनाने तातडीने घेतला नाही, तर मंत्र्याच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन तहसीलदार स्मिता गायकवाड यांनी स्वीकारले. यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे, युवा जिल्हाअध्यक्ष मोहसीन पटेल, उपाध्यक्ष पप्पू पाटील, इकबाल मुजावर, दत्तात्रय पांढरे, मोहसीन सय्यद उपस्थित होते.



















