पंढरपूर – तिर्थक्षेत्र पंढरपूरच्या सौंदर्यात भर पडावी व शहरातील नागरिकांना पहाटे पर्यावरणाच्या सानिध्यात फिरता यावे, यासाठी यमाई तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
आता या तलावाच्या परिसरात ऑक्सीजन पार्क आणि खुली व्यायाम शाळा तयार करणे तसेच या तलावाचे चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तब्बल दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे येथील नागरिकांतून आनंद व्यक्त होत आहे. कार्तिक यात्रेच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार हे काम मार्गी लावण्यात आले आहे.
पंढरपुरातील नागरिक दररोज पहाटे व सायंकाळी यमाई तलाव येथे फिरण्यासाठी जातात. मात्र या ठिकाणी सुविधा नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे याची दखल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली आहे. या तलाव परिसरात ऑक्सिजन पार्क व व्यायाम शाळा उभी करण्यात येवून या परिसरात व्यायामांची विविध प्रकारची साधने देखील बसविण्यात येणार आहेत. यामुळे तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना पहाटे मॉर्निंग वॉक बरोबर व्यायाम करण्याची सुविधा देखील मिळणार आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येथील यमाई तलाव सुशोभीकरणाच्या कामामध्ये लक्ष केंद्रित केल्यामुळे शासनाकडून दोन कोटी रुपये मंजुर झाल्याची भावना येथील नागरिकांतून व्यक्त केली जात असून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनात एकंदरीतच तिर्थक्षेत्र पंढरपूर बद्दल असलेल्या प्रेमभावने बद्दल समाधान देखील व्यक्त होत आहे.

























