सोलापूर – वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयात जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने “बायो इनोक्युलंट इन ॲग्रो इंडस्ट्रीज फॉर सस्टेनेबल ॲग्रीकल्चर” या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कृषी क्षेत्रातील शाश्वत विकास, जैवखत निर्मिती आणि औद्योगिक संधी या महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लोकमंगल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास घुटे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी होते. या कार्यक्रमात विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. राजशेखर हिप्परगी आणि समन्वयक म्हणून बायोटेक्नॉलॉजी च्या विभागप्रमुख डॉ. रचना कपूर उपस्थित होते.
आपल्या मनोगतात डॉ. घुटे यांनी संशोधनाची गरज अधोरेखित करताना जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पना आणि कृषी उद्योगातील वाढत्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी जैव इनोक्युलंट्समुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते, असे नमूद केले. प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी विद्यार्थ्यांनी प्रयोगशील दृष्टिकोन स्वीकारून संशोधन क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन केले.
कार्यशाळा दोन सत्रांमध्ये पार पडली. पहिल्या सत्रात बार्शी च्या शिवाजी महाविद्यालयातील डॉ. राहुल शेळके यांनी जैवखत निर्मिती प्रक्रियेवर सविस्तर व्याख्यान दिले. त्यांनी प्रयोगशाळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण देत बायोफर्टिलायझर तयार करण्याच्या तांत्रिक बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष सहभागातून सूक्ष्मजीव संवर्धन, माध्यम निर्मिती आणि गुणवत्तेनियंत्रण या बाबींचे ज्ञान आत्मसात केले.
दुसऱ्या सत्रात सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ श्री. अमोल शास्त्री यांनी “मास प्रोडक्शन ऑफ बायो इनोक्युलंट” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी औद्योगिक पातळीवर जैवखत निर्मितीची प्रक्रिया, त्यातील आव्हाने आणि बाजारपेठेतील संधी यावर सखोल माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन कसे करावे याविषयी त्यांनी उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले.
या राज्यस्तरीय कार्यशाळेस गोवा विद्यापीठ तसेच कुर्डुवाडी, पुणे, बार्शी आणि सोलापूर येथील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यशाळेला शैक्षणिक आणि व्यावहारिक दोन्ही स्तरांवर मोठे यश मिळाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. वैशाली गरगडे यांनी केले. सूत्रसंचालन कु. श्रद्धा जाधव व कु. प्राजक्ता कुलकर्णी यांनी प्रभावीपणे पार पाडले. पाहुण्यांचा परिचय कु. मृणाल चक्रे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल कट्टी यांनी केले.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरली असून शाश्वत शेती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला चालना देणारी ठरली आहे.

























