महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल आज, मंगळवारी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.51 टक्के लागला आहे. तर मुंबई विभाग 91.95 टक्क्यांसह तळाशी गेलाय.
यावर्षी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल 93.37 टक्के एवढा लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 2.12 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षी 91.35 टक्के निकाल लागला होता. पुणे विभागात 94.44 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोल्हापूर (94.24 टक्के), छत्रपती संभाजीनगर (94.04 टक्के), अमरावती (93 टक्के), लातूर (92.36), नागपूर (92.12 टक्के) आणि कोकण विभागाचा निकाल 97.51 टक्के लागला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळालातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनीने 100 टक्के गुण पटकावले आहेत. तिला परीक्षेत 582 तर क्रीडा विषयात 18 गुण मिळाले आहेत.
यंदाच्या निकालात मुलांपेक्षा 3.84 टक्क्यांनी जास्त मुलींची टक्केवारी वाढली आहे. सर्व विभागीय मंडळांतून 95.44 टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून 91.60 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 3.84 टक्क्यांनी जास्त आहे. एकूण 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.