किनवट : येणाऱ्या पवित्र रमझान महिन्याच्या पार्श्वभूमीवर किनवट नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते अभय नगराळे यांनी नगर परिषद प्रशासनास प्रभाग क्रमांक ४ सह शहरातील मुस्लिम बहुल भागांमध्ये आवश्यक नागरी सुविधा व उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत सविस्तर निवेदन सादर केले आहे.
रमझान महिन्यात मुस्लिम समाजात रोजा, नमाज, तरावीह व इफ्तार यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती व आरोग्य विषयक सुविधा सुचारू राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक ४ तसेच शहरातील सर्व मुस्लिम बहुल परिसरात दररोज नियमित स्वच्छता, कचरा उचल, नाल्यांची साफसफाई व औषध फवारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच रमझान कालावधीत पाणीपुरवठा नियमित व पुरेशा दाबाने करण्यात यावा, पाणीटंचाई भासणाऱ्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच शहरातील बंद व खराब अवस्थेतील पथदिवे तात्काळ दुरुस्त करून सर्व स्ट्रीट लाईट सुरू ठेवावेत, मशिदी व इफ्तार स्थळांच्या परिसरात अतिरिक्त प्रकाश व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अंतर्गत रस्ते, गल्लीबोळ व मशिदीकडे जाणारे मार्ग स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्याबाबतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
नगर परिषद क वर्ग अंतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व यंत्रणा, मनुष्यबळ व संसाधनांचा वापर करून रमझान काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा गटनेते अभय नगराळे यांनी व्यक्त केली आहे. नगर परिषद प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन रमझान सणाच्या पार्श्वभूमीवर योग्य व नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.






















