वैराग – वैराग भागात गेल्या दोन महिन्यात सोयाबीन चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या . चोरट्याने ४ ऑक्टोबरला बोरगाव झाडी येथील शेतकरी गोरोबा कृष्णा चव्हाण यांच्या घराजवळ मोकळया मैदानात पत्राशेडमध्ये ठेवलेले २७ सोयाबीनचे पोते (किंमत अंदाजे ६८००० रुपये) चोरट्याने चोरुन नेले होते. त्यानंतर २८ ऑक्टोबरला सारोळे (ता. बार्शी) गावातील शेतकरी सचिदानंद साहेबराव पाटील यांनी त्यांच्या शेतातील निघालेले सोयाबीन राहत्या घराच्या खाली ठेवण्यात आले होते तेथील ३६ सोयाबीनचे कट्टे (किंमत ७४,००० हजार रुपये) चोरीला गेले होते.
याप्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील अंमलदारांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती घेतली. गुन्ह्यातील करण भारत निपते (रा. खॉजा नगर, धाराशिव ) तर दुसरा सूरज रशीद शेख (२७,रा. शम्सपुरा धाराशिव) यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांचा शोध घेत त्यांना पकडले.
गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल मोहोळ पोलिस ठाणे तपास पथकातील अंमलदार व वैरागचे पोलिस कॉन्स्टेबल संदेश पवार, सुखदेव सलगर, सागर उमाटे, मुकूंद माळी यांनी जप्त केले. एकूण ६३ सोयाबीनचे पोते (किंमत दीड लाख), असा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


















