पवईतल्या जय भीम नगर परिसरामध्ये पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू असताना पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत १० ते १५ पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी सध्या पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान मनपा आयुक्त भूषण गगराणी हे देखील घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहेत.
पवईच्या जय भीमनगरमध्ये मोठ्याप्रमाणात झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस या परिसरात अतिक्रमणं वाढत आहे. त्यामुळे आज पालिकेकडून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अतिक्रमण कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यावेळी नागरिकांनी आंदोलनही केले. मात्र त्यानंतर संतप्त नागरिकांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
काय आहे प्रकरण?
२००५ साली पवईतील जय भीमनगर परिसरात कामगारांना तात्पुरता ट्रान्झिस्ट कॅम्प तयार करण्याची परवानगी देण्यात आली होती. नंतरच्या काळात याठिकाणी झोपड्यांची मोठी वसाहत निर्माण झाली. ही जागा शासकीय वसाहतीसाठी राखीव असल्याने पालिकेने अनेकदा याठिकाणी अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवेळी हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. आजदेखील पालिकेचे पथक पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण पाडण्यासाठी याठिकाणी आले होते. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिकांनी वस्तीच्या तोंडावर उभे राहून पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांची वाट रोखून धरली. पालिका अधिकाऱ्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिक रहिवाशांनी दगडांचा तुफान मारा सुरु केला. पोलिसांनी त्यांच्याकडे असणाऱ्या फायबरच्या ढालींनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेक इतकी जोरात झाली की, यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत.
झोपडपट्टी वाचविण्यासाठी पुढे येण्याचे स्थानिकांचे आवाहन
गेली २५ वर्षे ऊन-वारा-पाऊस झेलत आपल्या कुटुंबियांसह राहत असलेल्या पवईतील जयभीम नगर येथील सुमारे ८०० झोपड्यांना मुंबई महानगरपालिकेने बेकायदेशीर ठरवत त्यांना ४८८ अंतर्गत निष्कासनाची नोटीस बजावली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या दलित- गरीब व शोषित घटकांना बेघर करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. काल- परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत येथील झोपडीधारकांनी कामाच्या सुट्ट्या टाकून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. त्यामुळे मतदान घेताना कायदेशीर आणि मतदान संपल्यानंतर हे लोक बेकायदेशीर कसे? असा जळजळीत सवाल स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.
यासंदर्भात स्थानिक रहिवाशांकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकात पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांवर दडपशाहीचा आरोप करण्यात आला आहे. या पत्रकात म्हटले आहे की,नियमाच्या आडून पालिका व पोलिसांनी येथे बेबंदशाही सुरू केली आहे. यातून या झोपडीधारकांना घाबरवणे, धमकावणे व भयाचे वातावरण निर्माण करून यांना झोपड्या रिकाम्या करण्यास मजबूर करणे यात प्रशासन काही प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहेत. तर, अनेक झोपडीधारकांनी आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या घरासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याचे ठरवले आहे.