पंढरपूर – खाजगी ट्रॅव्हल्सकडुन होणारी प्रवाशांची लुट थांबवा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे केली आहे. दिवाळी सणानिमित्त आपआपल्या गावी जाण्यासाठी प्रवाशांची संख्या मोठी असते. हीच संधी साधून खाजगी ट्रॅव्हल्सकडुन अवाजवी भाडे घेऊन प्रवाशांची लूट चालू आहे. ती तात्काळ थांबवावी अशी मागणी अखिल भारतीयl ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य संतोष उपाध्ये यांनी जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पुणे, मुंबई,नाशिक, छ. संभाजीनगर, इ. ठिकाणाहून संपूर्ण महाराष्ट्रात जाणारे व पुन्हा आपल्या नौकरी, व्यवसायाच्या ठिकाणी परतणारे प्रवासी यांच्याकडून दीडपट दुप्पटपेक्षाही जास्त बसभाडे आकारणी करतात. सुधारित ग्राहक संरक्षण कायदा २०२० अन्वये ही “अनुचित व्यापारी प्रथा” या तरतुदीखाली येते त्यामुळे परिवहन विभागाने तातडीने अशा खाजगी ट्रॅव्हल्स मालक- चालकांवर कायदेशीर कारवाई करुन प्रवाशांची लूट थांबवावी.
या गंभीर बाबीकडे प्रशासन तात्काळ लक्ष देईल अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीचे तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,संघटक महेश भोसले,सदस्य सागर शिंदे,अंकुश वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.