नवीन नांदेड – नागपूर येथे दिनांक ९ ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान विधान भवनात आयोजित करण्यात आलेल्या ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी संघ सहभागी झाला आहे. या अभ्यासवर्गाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार तसेच माननीय एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे नेतृत्व प्रा. डॉ. कल्पना कदम, उपप्राचार्य, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड यांनी केले आहे. त्यांच्या सोबत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. स्नेहा कदम, कु. अश्विनी माने, राम पेटेकर, अक्षय सोळंके आणि विकास कणाके हे सहभागी झाले आहेत.
संसदीय अभ्यासवर्ग हा विद्यार्थ्यांना लोकशाहीची कार्यपद्धती, विधानसभेचे कामकाज, संसदीय परंपरा आणि राज्य कारभारातील निर्णयप्रक्रियेचे प्रत्यक्ष ज्ञान देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. नागपूर येथे होणाऱ्या या अभ्यासवर्गात राज्यातील विविध विद्यापीठांचे विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांना संसदीय कार्यप्रणालीचे सखोल प्रशिक्षण मिळणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होत असल्याने विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची ओळख, संसदीय परंपरांचे आकलन आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी लाभणार आहे. हा उपक्रम विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आयोजित केला जात आहे.
या अभ्यासवर्गात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व संघ व्यवस्थापकाचे अभिनंदन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, अधिष्ठाता डॉ. खडके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हुशारसिंग साबळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारोती गायकवाड तसेच जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी केले आहे.
























