सोलापूर : विद्यार्थिनींनी चांगले करिअर घडविण्यासाठी भरपूर शिक्षण घेण्याबरोबरच उत्तम संस्कारांची प्राप्तीही करावी, असे प्रतिपादन शिवपुरी येथील विश्व फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांनी केले. विश्व फाउंडेशनतर्फे सोनामाता प्रशालेसह विविध शाळांतील १९२ विद्यार्थिनींना नवे कपडे देण्यात आले.
सोनामाता प्रशालेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले, डॉ. गिरीजा राजीमवाले, डॉ. अग्रजा चिटणीस- वरेरकर, जर्मनी येथील अग्निहोत्र प्रसारक बिरगीट, अँड्रीया, सोलापूर शहर भाजपाचे उपाध्यक्ष मोहन डांगरे, सृष्टी डांगरे, निसर्गा डांगरे, संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा अत्रे, सचिवा सुवर्णा अत्रे, विश्वस्त ऍड. पी. एल. देशमुख आदी उपस्थित होते.
डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले म्हणाले, माता घडली तर समाज उभा राहतो. त्यामुळे मुलींनी उत्तम शिक्षण घ्यावे. विज्ञान, गणित, इतिहास, भाषा, संगणक शिकावे आणि सक्षम व्यक्तिमत्व घडवावे. शास्त्रज्ञ, वैद्यकीय, कायदा, अभियांत्रिकी अशा क्षेत्रातही विद्यार्थिनींचे वर्चस्व आणखी वाढण्याची आवश्यकता आहे. मुलींनी स्वतः सक्षम होऊन इतर गरजू मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही डॉ. राजीमवाले यांनी याप्रसंगी केले.
डॉ. अग्रजा चिटणीस- वरेरकर म्हणाल्या, विद्यार्थिनी या देशाचे भवितव्य आहेत. त्यांनी उत्तम शिक्षणाबरोबरच अग्निहोत्रासारख्या भारतीय संस्कृती परंपरांचा प्रसार करावा आणि समाजाच्या प्रगतीस हातभार लावावा. सृष्टी डांगरे म्हणाल्या, अग्निहोत्राचा प्रसार जगभरात झाला आहे. जगभरातील लाखो लोक नित्य अग्निहोत्र करत आहेत. भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेले अग्निहोत्र प्रत्येकाने दररोज केल्यास सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होईल, असेही सृष्टी डांगरे यांनी सांगितले.
सृष्टी डांगरे यांनी प्रास्ताविक तर शिक्षक राजू मानकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी सोनामाता प्रशालेचे मुख्याध्यापक विनोद शिंदे, सुवर्णा गव्हाणे, सुप्रिया कुलकर्णी, रमेश बेडगे आदी उपस्थित होते.


















