सोलापूर : आजच्या वेगाने बदलणाऱ्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, परस्पर सहकार्य आणि सकारात्मक दृष्टिकोन अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांनी इतरांशी नव्हे, तर स्वतःशी स्पर्धा करीत सातत्याने स्वतःचा विकास साधावा, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव व प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी केले.
वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्सच्या ६२ व्या आणि ६३ व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी होते.
विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन करताना डॉ. कांकरिया यांनी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांच्या यशस्वी कारकिर्दीचे उदाहरण दिले. जीवनात काय करायचे आहे, हे लवकर निश्चित करणे महत्त्वाचे असून केवळ गुणांपेक्षा गुणवत्तेला अधिक महत्त्व द्यावे, असे त्यांनी सांगितले. आवड, निवड, शारीरिक व मानसिक क्षमता यांचा योग्य समतोल राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच वाचन, नियमित व्यायाम, संतुलित आहार यांना प्राधान्य देऊन व्यसनांपासून दूर राहावे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य प्रा. डॉ. राजशेखर हिप्परगी यांनी प्रास्ताविक केले, तर उपप्राचार्य प्रा. डॉ. मनोहर जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी केले.
गणित विषयात प्रतिवर्षी प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला सुवर्णपदक देण्याची परंपरा जपल्याबद्दल डॉ. जयवंत अनंतपूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
उत्कृष्ट कलाकार म्हणून कु. प्रणिती चांगभले, कु. समृद्धी भोसले, अनिकेत गायकवाड आणि रोहन सर्वगोड, तर आदर्श विद्यार्थी म्हणून कु. नंदिनी पाटील व नागेश सानसाखळे यांना गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, अश्विन बोंदार्डे, परीक्षा नियंत्रक प्रा. डॉ. सयाजीराव गायकवाड, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारितोषिकांचे वाचन प्रा. निकिता पोटाबत्ती, प्रा .श्रद्धा जाधव, प्रा.संतोष रेळेकर, क्रीडा शिक्षण राहुल हजारे आणि डॉ. अभय जाधव यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना इंजल व डॉ. अंजना गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. आनंद महाजन यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता कु. श्रद्धा रोडगे यांच्या पसायदानाने झाली.

























