सोलापूर – “विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता, आपण शिकत असलेल्या पाठ्य घटकाचा उपयोग दैनंदिन जीवनात कुठे आणि कसा केला पाहिजे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी निर्भयपणे शिक्षकांना प्रश्न विचारावेत आणि आपली जिज्ञासा जागृत ठेवावी,” असे प्रतिपादन डब्ल्यू. आय. टी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय आठवले यांनी केले.
कै. वि. गु. शिवदारे जन्मशताब्दी समारोह समिती आणि मराठी विज्ञान परिषद, सोलापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युनिक इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे उपस्थित होते.
दिनांक १५ व १६ डिसेंबर २०२५ असे दोन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात यंदा ४० शाळांमधून ३०० विद्यार्थी सहभागी झाले असून, एकूण १३७ उपकरणे मांडण्यात आली आहेत. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या जोडीला इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही आपला लक्षणीय सहभाग नोंदवला आहे.
प्रदर्शनामध्ये शेती, सुरक्षा आणि दैनंदिन गरजांवर आधारित अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. यामध्ये ड्रोनद्वारे पिकावर औषध फवारणी, आधुनिक कांदा साठवण यंत्रणा, डोंगराळ भागातील पाणी व्यवस्थापन आणि पुराची पूर्वसूचना देणारी मोबाईल प्रणाली यांसारख्या शेतीपूरक उपकरणांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी केवळ विज्ञानच नाही तर समाजभानही जपल्याचे या प्रदर्शनात दिसून आले. फॅनला लटकून होणाऱ्या आत्महत्या रोखणारा ‘सेफ्टी फॅन’, ज्येष्ठ नागरिकांसाठी चालणे व बसणे यासाठी उपयुक्त ‘स्टिक अँड चेअर मॉडेल’, छतावरील सोलर पॅनेल स्वच्छ करणारे ड्रोन, ६० किमी मायलेज देणारी ई-बायसिकल आणि उघड्या मेनहोलमुळे होणारे अपघात टाळणारी यंत्रणा या उपकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना राजशेखर शिवदारे म्हणाले की, “जेव्हा मुले विज्ञानाची प्रात्यक्षिके पाहतात, तेव्हा त्यांची विचारशक्ती प्रगल्भ होते. ही जिज्ञासाच त्यांना भविष्यात संशोधनाकडे वळवण्यास मदत करेल.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. व्यंकटेश गंभीर यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त भीमाशंकर शेटे, शैक्षणिक सल्लागार सौ. अंजली तिवारी, मुख्याध्यापिका सौ. पूजा बाजपेयी, विज्ञान विभाग प्रमुख अश्विनी बिराजदार, मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष निनाद शहा, कार्यवाह क्रांतीवीर महिंद्रकर, आणि सौ. वैशाली धायगुडे यांच्यासह विविध विभागांचे प्राचार्य व समिती सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीचे विद्यार्थी तन्मय वनवे आणि गायत्री टक्कळकी यांनी सौ. मानसी झळकींकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुरेखपणे केले. आभार प्रदर्शन सातवीची विद्यार्थिनी कु. जान्हवी कस्तुरकर हिने केले.
प्रदर्शन पाहण्याची संधी
हे विज्ञान प्रदर्शन उद्या मंगळवारी दिनांक १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, सकाळी १० ते ३ या वेळेत ते सर्वांसाठी पाहण्यासाठी खुले आहे, तरी सोलापूरकरांनी आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

























