बार्शी – सोलापूर जिल्हा शालेय आट्यापाट्या स्पर्धा दि. २१ नोव्हेंबर रोजी जिजाऊ गुरुकुल, खांडवी (ता. बार्शी) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत १४ वर्षे मुले, १७ वर्षे मुले आणि १९ वर्षे मुले असे मिळून एकूण २१ संघांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेतील १९ वर्षे मुलांच्या गटात जिजाऊ गुरुकुल, खांडवी संघाने उत्कृष्ट खेळ करत तावशी संघावर विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. विजयानंतर संघातील खेळाडूंसह मार्गदर्शक गणेश वडेकर, दत्ता झांबरे व वैभव कंधारे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सोलापूर जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कापसे, सचिव राजकुमार मुंबरे, जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे, सचिव वर्षा घाडगे, प्रशासकीय अधिकारी किशोर कदम, डायरेक्टर संदेश कदम व फिजिकल कोच जे. बी. शिंदे उपस्थित होते.
स्पर्धेचे झालेले उत्तम आयोजन आणि अनुशासनबद्ध पार पाडलेली स्पर्धा याबद्दल मान्यवरांनी जिजाऊ गुरुकुलचे कौतुक केले. विजयी संघास आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



















