सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव – सोलापूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या वतीने अटल–एफडीपी ऑफलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट सहा दिवसीय प्रोग्रामचे यशस्वी समारोप झाला.
कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वच्छ ऊर्जा व भविष्यातील वाहतूक प्रणालीच्या दिशेने अभियांत्रिकी शिक्षण अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने AICTE–ATAL अकॅडमीच्या आर्थिक सहाय्याने आयोजित “मोबिलिटीच्या नव्या युगासाठी अभियांत्रिकी 5.0” या सहा दिवसीय ऑफलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) चा यशस्वी समारोप शनिवारी झाला. सोमवारी उद्घाटन झाले होते.
या FDP मध्ये इलेक्ट्रिक वाहन (EV), हायब्रिड मोबिलिटी, क्लीन एनर्जी, EV डिझाईन, बॅटरी पॅक तंत्रज्ञान, संशोधन, नवोन्मेष व उद्योजकता या अत्यंत समकालीन व भविष्याभिमुख विषयांवर देशातील नामांकित उद्योग क्षेत्र तसेच अग्रगण्य शैक्षणिक संस्थांतील तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
योगेश भाटेश्वर यांनी भारतीय परिस्थितीनुसार इलेक्ट्रिक वाहनांचे डिझाईन, EV संशोधन, बॅटरी पॅक डेव्हलपमेंट, तसेच भारतातील नव्या उद्योजकतेच्या संधी यावर प्रभावी सत्र घेतले. स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने भारताची वाटचाल आणि EV क्षेत्रातील भविष्यातील संधी त्यांनी सविस्तरपणे मांडल्या. 2030 स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांवर सखोल दृष्टीकोन CRTD चे संचालक डॉ. एस. एच. पवार यांनी भारताच्या 2030 स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टां पूर्ततेसाठी इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या क्लीन एनर्जी सोल्युशन्स यावर सखोल मार्गदर्शन करुन उपस्थितांना दीर्घकालीन दृष्टीकोन दिला. ऊर्जा व्यवस्थापन, टिकाऊ तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक विकास यावर त्यांनी भर दिला.
हा कार्यक्रम कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या नेतृत्वाखाली आणि प्राचार्य डॉ शंकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्रा. माणिक शिंदे, प्रा. अनिल ए. कोटमाळे, प्रा. राजकुमार लांडगे, प्रा. अनंतराव पाटील, प्रा. यू. एम. हळ्ळी, प्रा. आर. डी. चव्हाण व प्रा. एम. के. पवार यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम अभियांत्रिकी शिक्षणात नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करून भविष्यातील सक्षम मनुष्यबळ घडविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे यावेळी उपस्थितानी नमूद केले.
कुशल नियोजनामुळे FDP यशस्वी
हा संपूर्ण सहा दिवसीय FDP विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख व ATAL FDP समन्वयक डॉ. व्ही. एस. बिरादार यांच्या कुशल नियोजन, प्रभावी नेतृत्व आणि समन्वयामुळे यशस्वीरित्या पार पडला.
























