नवीन नांदेड – श्री गुरू दशमुख आश्रम, भिमाशंकरनगर गोपाळचावडी नवीन नांदेड (महाराष्ट्र) येथे दि.५ फेबु्रवारी ते १२ फेबु्रवारी २०२६ या कालावधीत विश्र्वशांती महायज्ञ आणि श्री केदारनाथ रावळ जगद्गुरू पट्टाभिषेक रजत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी केदारनाथ मंदिराचा देखावा तयार करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा खा.अशोक चव्हाण यांनी नुकताच घेतला. या महोत्सवाचे जय्यत तयारी चालू आहे.
गोपाळ चावडी येथील श्री गुरू दशमुख आश्रम, भिमाशंकरनगर गोपाळचावडी नवीन नांदेड (महाराष्ट्र) येथे ५ फेबु्रवारी ते १२ फेबु्रवारी २०२६ या कालावधीत गोपाळचावडी येथे १०८ महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती राहणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. केदार जगद्गुरु यांचे आशिर्वाद घेवून सांगितले. एवढेच नसून या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेवून येणार असल्याचेही अभिवचन जगद्गुरु यांना त्यावेळी दिले.या कार्यक्रमासाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, उत्तराखंड यासह आदी राज्यांचे मुख्यमंत्री, साधु, संत, महंत यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार आहे. यामध्ये दि.५ फेबु्रवारी रोजी सकाळी ५ ते ७ या वेळेत श्रीमद् जगदगुरू विश्र्वराध्य मुर्तीस रुद्रअभिषेक यानंतर पंचाचार्य ध्वजारोहण त्यानंतर शोभा यात्रा ही शोभा यात्रा श्री केदारेश्र्वर सतसंग भवन आनंदनगर ते जुना मोंढा अशी निघणार आहे. या नंतर धर्मसभा त्यानंतर दि.६ ते ११ फेबु्रवारी या कालावधीत दैनंदिन कार्यक्रमात श्रीमद जगदगुरू विश्र्वराध्य मुर्तीस रुद्राभिषेक त्यानंतर यज्ञ स्वाहाकार त्यानंतर महाप्रसाद, शिवकथा यज्ञ स्वाहाकार, धर्मसभा आणि किर्तन जागरण हा दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहे. समारोप दि.१२ फेबु्रवारी रोजी पार पडणार आहे. यामध्ये पटाभिषेक रजत महोत्सव आणि धर्मसभा यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.यात विश्र्वशांती महायज्ञात १०८ यज्ञ कुंड तयार करण्यात आले आहेत. याचबरोबर दररोज एक लाख नागरीकांना महाप्रसादाचा लाभही घेता येणार आहे. यासाठी विशेष मंडप उभारण्यात आले आहे. या विश्र्वशांती महायज्ञाच्या सोहळ्याच्या अंतिम तयारीची पाहणी श्री हिमवन केदार वैराग्य सिंहासनाधीश्र्वर श्री.श्री.श्री.१००८ केदारनाथ रावल जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी,
खा.अशोक चव्हाण यांनी केली असून यावेळी त्यांच्यासोबत नगसेवक किशोर स्वामी, नगरसेवक संजय घोगरे, बालाजी पांडागळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.


















