सोलापूर – धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड परिसरात दिनांक 19 ऑक्टोबर रोजी तब्बल 7.5 फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीतील सुरक्षा अधिकारी श्री. विद्वान गजधाने यांना हा अजगर सर्वप्रथम दिसला. त्यांनी तात्काळ स्थानिक सर्पमित्र नागेश बिराजदार यांना या घटनेची माहिती दिली. स्थानिक सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून या सापास ताब्यात घेतले. अजगर हा साप प्रथमच त्यांना आढळून आल्याने त्यांनी याची माहिती सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना दिली. माहिती मिळताच राहुल शिंदे व नाग फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल अलदार व टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सापाची अधिक पाहणी केल्यावर हा साप सुदृढ असल्याचे निश्चित झाले. यावेळी स्थानिक सर्पमित्र राजकुमार बिराजदार, अमोल बिराजदार, मल्लिकार्जुन हीरोळे आणि नागेश बिराजदार यांनी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोलाची मदत केली. सोलापूर जिल्ह्यात अतिशय दुर्मिळ असणारा हा साप असून हा वन्यजीव अधिनियम 1972 च्या कायद्याअंतर्गत अनुसूची 1(शेड्युल 1) मध्ये समाविष्ट असल्याने याला एखाद्या वाघा ईतकेच संरक्षण प्राप्त होते. यामुळे या घटनेची माहिती सहाय्यक उपवनसंरक्षक अजित शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण गांगुर्डे आणि वनरक्षक श्रीशैल पाटील यांना कळविण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत सुरक्षितपणे पार पडले. सर्पमित्रांनी अतिशय काळजीपूर्वक या अजगराला पकडले आणि त्याला तात्काळ त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. यावेळी गोकुळ शुगर्सचे रावसाहेब गदादे, अरविंद जंगाले व कर्मचारी तसेच वनसेवक बसवराज हिरोळे आणि सोलापूरचे सर्पमित्र संतोष धाकपाडे व शिवानंद हिरेमठ हेही उपस्थित होते.
अजगर हा साधारणपणे जंगले, खडकाळ प्रदेश, नदीकाठचे घनदाट झुडपे किंवा शेताजवळील उसाच्या लागवडीमध्ये उष्णता आणि लपण्यासाठी जागा शोधत असतो. सोलापुरात मागच्या महिन्यात आलेल्या पुरामुळे अजगरांसारख्या प्राण्यांचे स्थलांतर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय सोलापुरात अजगर आढळल्याची नोंद बोटावर मोजण्याइतकी असली तरी धोत्री आणि करजगी या भागाचा अभ्यास केल्यास, भीमा नदीचा परिसर आणि तेथील नैसर्गिक वनांमुळे या सापांना अनुकूल अधिवास (Habitat) मिळतो. वनविभागाने या घटनेची तत्परता दाखवत आमच्या टीमला तात्काळ सहकार्य केल्याने हा अजगर मानवी हद्दीतून त्वरित त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यास जलदगती मिळाली.
सर्प अभ्यासक राहुल शिंदे, सोलापूर
हा साडेसात फुटी अजगर खूपच मोठा आणि सशक्त होता. गोकुळ शुगर इंडस्ट्रीज पासून धोत्री गाव 2 किलोमीटरवर असून मानवी वस्तीजवळ तो आल्याने त्याला तात्काळ रेस्क्यू करणे आवश्यक होते. अशा मोठ्या सापाला पकडताना त्याच्या सुरक्षिततेला आणि पकडणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला महत्त्व देणे गरजेचे असते. आमच्या टीमने या अजगरास अत्यंत शांतपणे आणि शास्त्रीय पद्धतीने रेस्क्यू करून तेथील उपस्थिनांमध्ये सापांबद्दल जनजागृती करण्यात आली. सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल.
अनिल अलदार, अध्यक्ष, नाग फाउंडेशन
अजगर हा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 च्या शेड्यूल I (अनुसूची १) मध्ये समाविष्ट असलेला अत्यंत महत्त्वाचा आणि संरक्षित प्राणी आहे. या कायद्यामुळे अजगराला मारणे, पकडणे किंवा त्याचा छळ करणे हा गंभीर गुन्हा आहे. पर्यावरणातील उंदिर, घुस आणि लहान सस्तन प्राण्यांवर नियंत्रण ठेवणारा हा प्राणी अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. गोकुळ शुगर इंडस्ट्रीज व्यवस्थापन, रावसाहेब गदादे व अरविंद जंगाले, वनसेवक बसवराज हिरोळे तसेच सर्प अभ्यासक राहुल शिंदे आणि नाग फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल अलदार यांच्या संपूर्ण टीमने रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी पार पाडले याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.
*श्रीशैल पाटील वनरक्षक, सोलापूर.*


















