माहूर / नांदेड – माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पार्डी दासू नाईक तांडा येथील एका कर्जबाजारी शेतकरी महिलेने राहत्या घरी सकाळी पाच वाजता विषारी औषध प्राशन केल्याने घरच्या मंडळींनी तिला वाई बाजार आणि माहूर येथील रुग्णालयात दाखल केले असता तिची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवल्याची ह्रदयद्रावक तेवढीच खळबळजनक घटना दि.१२ रोजी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पार्डी दासू नाईक तांडा येथील सुनिता परसराम राठोड वय 49 वर्षे यांची माहूर शिवारात गट नंबर 83 मध्ये पाच एकर कोरडवाहू शेती आहे.त्यांचेवर भारतीय स्टेट बँक शाखा, माहूरचे एक लाख रुपये कर्ज असल्याचे समजते. तसेच बचत गटांचे कर्ज असल्याने बँकेकडून व बचत गटाकडून सततचा तगादा झाल्याने त्यांना सदरील आर्थिक व मानसिक त्रास सहन झाला नाही. त्यामुळे दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता राहत्या घरात त्यांनी विषारी औषध प्राशन केले.
सदरील घटना त्यांचे पती परसराम राठोड व मुलगा यांना कळाल्याने त्यांनी लगेच त्यांना महेंद्र चव्हाण, गणपत मडावी यांच्या मदतीने वाईबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.तेथे परिस्थिती आणखी बिघडल्याने त्यांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांची उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली.
उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याने पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रकाश गेडाम, पोलीस नाईक सत्यपाल मडावी यांचे सह पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. डॉ.बिपिन बाबळे यांनी मयताचे शवविच्छेदन केले. त्यांचे पश्चात पती,सासू, मुलगा असा परिवार असून बँकांचा तगादा आणि बचत गटांचे एजंट वेळोवेळी कर्जाची मागणी करत त्रस्त करून सोडत असल्याने पुरुष कर्जबाजारी शेतकऱ्यासह आता महिला कर्जबाजारी शेतकऱ्यावरही आत्महत्या करण्याची गंभीर पाळी येत असल्याने शासनाने सर्व प्रकारची कर्ज वसुली तात्काळ थांबवून मयतांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.



















