अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. यावर अहमदनगरचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्विकारावा, असा खोचक टोला निलेश लंकेंनी सुजय विखेंना लगावला आहे.
सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी केल्यानंतर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिला आहे. विखे कुटुंबाला इतिहास आहे. यशवंतराव गडाख यांच्याबाबतही विखे कुटुंबियांकडून असंच करण्यात आल्याचे लंके म्हणाले. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत शंका उपस्थित करत एक प्रकारे केंद्रीय यंत्रांवरच विखेंनी आक्षेप घेतला आहे.
व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी 18 लाखांचं शुल्कही भरलं…
सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यासाठी एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये याप्रमाणे एकूण 18 लाख 88 हजार रुपयांचे शुल्कदेखील भरले आहे. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5 , कर्जत- जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली. लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांचा 28929 मतांनी पराभव झाला.
राजकीय चर्चांना उधाण
मविआ उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली. दरम्यान सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
निवडणूक आयोगाकडे जाणार प्रस्ताव
जिल्हा निवडणूक विभागाने याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव भारतीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission) जाणार आहे. 45 दिवसांच्या आत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली, तर न्यायालयाच्या परवानगीने पडताळणीचा निर्णय होणार आहे. जर कोणी न्यायालयात गेले नसल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही होणार आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे आशीर्वाद घेणार : निलेश लंके
दरम्यान, अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबियांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यांनी म्हटलंय की, यापुढे सहमतीचे राजकारण करणार आहे. विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान आहे. मी कुठेही गेलो तरी विखे कुटुंबीय आमच्या नगरचे असल्याचे सांगत असतो. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे आशीर्वाद घेणार असल्याचे निलेश लंके यांनी म्हटले आहे.