शरद पवार साहेबांची राजकारणामध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी पन्नास वर्षांमध्ये सल्ला दिला असून ते राजकारणाच्या केंद्रबिंदूमध्ये होते. मग त्यांनी मराठा आरक्षण संदर्भात निर्णय का घेतला नाही? असे विचारणा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ते आज कोल्हापूरमध्ये बोलत होते.
राजकीय स्वार्थापोटी समाजात तुकडे तुकडे पाडले जात आहेत
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरून शरद पवार यांच्यावर तोफ डागली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजकीय स्वार्थापोटी समाजात तुकडे तुकडे पाडले जात आहेत, हे बरोबर नाही. अनेक संत महतांनी समाज एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काहीजण राजकीय स्वार्थासाठी तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारणात तेल टाकण्याचे काम करू नका. तुम्ही देखील यात भस्म व्हाल, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये एक बैठक घेणार
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरून सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. पाटील यांनी सांगितले की, ब्लड रिलेशनमध्ये बसणाऱ्या कोणालाही जात पडताळणी करण्याची गरज नाही. यामध्ये काही खोट मारून ठेवली आहे. रक्त नातेसंबंध आणि सगेसोयरे हे एकच शब्द असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. पाटील यांनी ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये एक बैठक घेणार असल्याचेही सांगितले. रक्त नातेसंबंध आणि सगेसोयरे हा एकच शब्द असल्याचे आम्ही पटवून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या दोघांनी सुद्धा आपण समाजाचा घटक आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे, असे ते म्हणाले. जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने सगेसोयरे अधिसूचना काढल्याचे पाटील म्हणाले. आता त्यांना नेमकं काय हवं आहे हे पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीनंतर जीआर निघेल
दरम्यान, मोफत मुलींच्या शिक्षणावरून घोषणा केल्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला. पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीनंतर त्याचा जीआर निघेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.