धाराशिव – सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र, प्रती गुंठा ७ ते १० हजार रुपये मावेजा देण्याचे जाहीर केले आहे. हा मावेजा अतिशय तुटपुंजा व अत्यल्प असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. समृद्धी महामार्गासाठी जो दर दिला होता तोच दर या शेतकऱ्यांना देण्यात यावा. विशेष म्हणजे एका जिल्ह्यात अशा पद्धतीने शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर आम्ही तो सहन करणार नाही. विशेष म्हणजे बागायती जमिनी असताना त्या चक्क जिरायती दाखविलेल्या आहेत. तसेच फळे असलेल्या वृक्षाचे रूपांतर रोपांमध्ये दाखवून त्याची किंमत शून्य करण्याचा पराक्रम महसूल विभागाने केला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निरसन करून योग्य भूसंपादित होणाऱ्या जमिनीस योग्य दर देण्यासह शेतकऱ्यावरील अन्याय दूर करावा. अन्यथा हा मार्ग होऊ देणार नसल्याचा सज्जड दम वजा इशारा परंडा तालुक्यातील शिरसाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच त्यांच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नव्हे तर त्या सातबारा वरून शेतकरीच कोरा करण्याचे धोरण असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी दि.२६ फेब्रुवारी रोजी केला. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच ठिय्या देत धरणे आंदोलन केले.
अहमदनगर-सोलापूर-अक्कलकोट या ‘सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड’ महामार्गासाठी परंडा तालुक्यातील हजारो एकर सुपीक जमीन संपादित केली जात असताना, प्रशासनाने जाहीर केलेले जमिनीचे दर अत्यंत तुटपुंजे आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करत परंडा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
परंडा तालुक्यातील चिंचपूर (खु), पांढरेवाडी, ऊंडेगाव, रत्नापूर, मलकापूर, चिंचपूर (बु), अनाळा, रोहकल, कुंभेफळ, टाकळी, कांदलगाव, जवळा (नि), सिरसाव, हिंगणगांव (ब) आणि आरणगांव या १५ गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत त्यांनी आपला आक्रोश तीव्रपणे व्यक्त केला. तसेच आमच्या पिढ्यानपिढ्यांपासून असलेल्या बागायती जमिनी महामार्गासाठी घेतल्या जात असताना, प्रशासनाकडून रेडीरेकनरच्या नावाखाली केवळ ७ ते १० हजार रुपये प्रती गुंठा असा दर दिला जात आहे. जो धुळे-सोलापूर महामार्गाच्या (२.५ ते ४ लाख प्रती गुंठा) तुलनेत अत्यंत तुटपुंजा व नगण्य आहे. जोपर्यंत समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर योग्य मोबदला मिळत नाही आणि शेतात जाण्यासाठी सर्व्हिस रोडचे स्ट्रक्चर स्पष्ट केले जात नाही.
तोपर्यंत आम्ही जमिनीचा ताबा देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत प्रत्येक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या निवेदन देत प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध नोंदवला आहे. यावेळी तानाजी चोबे, विकास चोबे, ऍड. गोविंद कोठुळे, सोमनाथ कापसे, हरिश्चंद्र बारस्कर, दादा आवळे, ज्ञानेश्वर कोठुळे, हैदर शेख, विश्वास चोबे, अमन खान, नितीन नायकोडे, रणजीत लांडगे, विकास जगदाळे, शहाजी नायकोडे आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

























