मुदखेड – शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित व जिव्हाळ्यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते . लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या समन्वयातून सकारात्मक तोडगा काढून लेखी आश्वासन देण्यात आल्याने उपोषणकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद पवार निवघेकर यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे .
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद वेंकटराव पवार यांनी प्रजासत्ताक दिनापासून तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आमरण उपोषण सुरू केले होते. शेतकऱ्यांच्या जनहिताच्या निगडित अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणात बसले होते . यामध्ये शेतकऱ्यांना सिंगल फेजच्या माध्यमातून 24 तास वीज पुरवठा मिळावा ग्रामीण रस्त्याच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा . वन्य प्राण्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रभावी संरक्षणात्मक उपायोजना राबवाव्यात शिवपांदण रस्ते , बांध रस्ते , मोकळे करून देण्यात यावे या प्रमुख मागण्या होत्या .
चार दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाशी दखल भोकर विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी घेतली आहे . याबाबत संबंधित प्रशासनाशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत . आमदार श्रीजया चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश देशमुख बारडकर , माजी सभापती लक्ष्मण जाधव यांनी आमरण उपोषणकर्त्याची भेट घेऊन चर्चा केली . नायब तहसीलदार मारोती जगताप यांनी उपोषण स्थळास भेट देऊन सकारात्मक चर्चा करत प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले आहे . आमदार श्रीजया चव्हाण यांच्या शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाची तातडीने दखल घेतल्याने प्रशासनाच्या सकारात्मक निर्णयातून अखेर उपोषण मागे घेण्यात आले आहे . यावेळी नायब तहसीलदार मारोती जगताप , निलेश देशमुख बारडकर , मारोतराव पवार , सरपंच प्रतिनिधी रमेश लखे , शामराव लखे यांच्यासह आदींची उपस्थिती होती . लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयातून तोडगा काढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे .
आमदार श्रीजया चव्हाण यानी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाची दखल घेऊन महावितरण कंपनीशी चर्चा करून निवघा ३३ केवी उपकेंद्रा अंतर्गत सिंगल फेजिंग लाईन सुरू केली आहे . यासोबत वनविभागाअंतर्गत वन प्राण्यांमूळे झालेल्या नुकसानीच्या आर्थिक मदतीचे धनादेश तातडीने देण्याच्या सूचना वन विभागाला दिली आहे . यासोबतच पांदण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे . यामुळे आमरण उपोषण तुर्त शेतकऱ्यांनी परत घेतले आहे.


















