मंगळवेढा – “एफ.आर.पी. साठी साखर संघ आणि सरकारला सुप्रीम कोर्टात लोळवलं, आता काटामारी आणि रिकव्हरी चोरीवर पुन्हा लोळवायचं हाय!” या जोशपूर्ण गर्जनेने ऊस शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याला नवा वेग मिळवण्यासाठी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २४ वी ऊस परिषद’ जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
ही परिषद गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता विक्रमसिंह क्रीडांगण, जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे पार पडणार आहे. ऊस दर, काटामारी, रिकव्हरी चोरी, थकीत एफ.आर.पी., तसेच साखर कारखानदारांच्या मनमानी विरोधात पुढील निर्णायक रणशिंग या परिषदेत फुंकले जाणार आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो ऊस उत्पादक शेतकरी या परिषदेस उपस्थित राहणार असून, “आपल्या हक्कासाठी, आपल्या घामाच्या मोबदल्यासाठी” अशी भावनिक हाक संघटनेने दिली आहे.
या परिषदेत ऊस दराचा नवीन फॉर्म्युला, एफ.आर.पी. अंमलबजावणीतील विसंगती, व साखर उद्योगातील पारदर्शकतेचा अभाव या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडली जाणार आहे. शेतकऱ्यांना “हक्काचं ऊस आंदोलन” या घोषवाक्याने प्रेरित करत, स्वाभिमानी संघटनेची ही परिषद पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढाईचा नवा टप्पा ठरणार आहे.
कोट–“जयसिंगपूर येथे ही केवळ ऊस परिषद नाही, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठीची निर्णायक लढाई आहे. मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या हक्काच्या आवाजासाठी १६ ऑक्टोबरला जयसिंगपूरला पोहचलेच पाहिजे. ऊसाच्या घामाला न्याय मिळवण्यासाठी ही उपस्थिती म्हणजे आपला स्वाभिमान ठरेल!”
– युवराज घुले, जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना