सोलापूर – जिल्हा परिषद पंचायत व समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना केवळ एका ‘सूचक’ आवश्यकता असणार आहे. त्यामुळे उमेदवारांची सूचक शोधण्याची कटकट कमी होणार आहे. दक्षिणमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी १६ जानेवारीपासून ७ फेब्रुवारी पर्यंत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येणार आहे.
त्यामुळे राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन दक्षिणचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात आयोजित पत्रपरीषदेत तहसीलदार जमदाडे यांनी माहीती दिली.
दक्षिण तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणासाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून दक्षिणमधील २४७ मतदास केंद्रांमधून २ लाख ६७ हजार २३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये एक लाख १५ हजार २२८ पुरूष, एक लाख ८ हजार १२३ महिला तर १६ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. यामध्ये ४ हजार ३७८ दुबार मतदार आहेत. त्यांच्याकडून एकाच ठिकाणी मतदान करण्याचे हमीपत्र घेण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर हमीपत्र पोहोच करण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणची सहीची खात्री झाल्यानंतर मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंत असून २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे . २३ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान अर्ज माघार घेण्याचा कालावधी आहे. मात्र यावेळी रविवार २५ जानेवारी आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनमुळे शासकीय सुट्टी असल्याने या काळात अर्ज माघारीची प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यानंतर २७ जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारी निश्चित केली जाणार आहे . ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी दोन हजारपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना तीन टप्यात प्रशिक्षण देण्यात रेणार आहे. तसेच उमेदवारांना सर्व प्रकारचे परवाना देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार आदर्श मतदान केंद्र निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच आचारसंहितेवर लक्ष ठेवण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथक १८ ,फिरते सर्वेक्षण पथक १२ ,व्हिडिओ सर्वेक्षण पथक ०४ विशेष व्हिडिओ पथक ०२ असणार आहेत.
७ फेब्रुवारी रोजी ‘एस.आर.पी. कॅम्प’ येथे मतमोजणी प्रक्रीया पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
…..
चौकट
….
* सर्व परवानासाठी एक खिडकी योजना
* २५ व २६ जानेवारी रोजी अर्ज माघार प्रक्रीया बंद
* दुबार मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करण्याचे घेतले हमीपत्र
* एसआरपी कॅंप येथे मतमोजणी प्रक्रीया
* ३६ विविध पथकाद्वारे आचारसंहितेचे पालन व नियंत्रण
* दक्षिणचे सर्व सीमांवर स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्त
* मतदान केंद्रावर सर्व सोईसुविधा देण्यात येणार
* आदर्श मतदान केंद्र उभारणी करणार
* निर्भय व शांततेत मतदान पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज
* दोन हजार कर्मचार्यांना तीन टप्यात प्रशिक्षण























