पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘ईव्हीएम’ ऐवजी मतपत्रिकेवर घ्या, अशी आग्रही मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी मंगळवारी (ता.११) केली.”ईव्हीएम नको- मतपत्रिकेवरच मतदान घ्यावे”, हीच बसपाची अगोदर पासूनची भूमिका आहे. मतपत्रिका हीच मतदारांच्या इच्छेचे खरे प्रतिबिंब दाखवते, असे मत व्यक्त करीत डॉ.चलवादी यांनी आयोगाला तातडीने पुनर्विचार करून पारदर्शक निवडणुकीसाठी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याचे आवाहन केले.
राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’ मशीन न वापरण्याचा निर्णय जाहिर केला आहे. मात्र हा निर्णय घेऊन कुठल्या राजकीय शक्तीची पाठराखण आयोग करतेय, हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी डॉ.चलवादी यांनी केली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रलंबित याचिकेची सुनावणी करतांना राज्य निवडणूक आयोगाला “व्हीव्हीपॅट का वापरणार नाही?” याचे स्पष्टीकरण मागितले आहे.
मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असणे आवश्यक आहे.संपूर्ण ईव्हीएम प्रणालीबाबत जनतेत संशय असून, मतदानानंतर मतदाराला स्वतःचा मतनोंदणीचा पुरावा मिळावा म्हणून व्हीव्हीपॅट मशीनचा वापर गरजेचा आहे. मात्र आयोगाने तोच भाग टाळल्याने लोकशाहीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.
*बॉक्स*
मतदार यादीवरही संशय!
मतदार यादीत दुबार नाव असलेल्या मतदारांची ओळख पटवून ते कुठे मतदान करणार याची माहिती अधिकारी घेतील, असे राज्य आयोगाने स्पष्ट केले.मात्र, हे व्यावहारिक दृष्टिकोनातून खरंच शक्य का? ज्या यादीवर विश्वासच नाही, त्या यादीवर निवडणुका कशा काय? असा सवाल डॉ.चलवादी यांनी उपस्थित केला.मतदार यादीतील त्रुटी, नावे गहाळ होणे, दुबार नोंदी आणि चुकीच्या पत्त्यांचे आणि एकच पत्यावर अनेक मतदारांच्या नोंदणीचे अनेक प्रकार समोर आले असताना त्याच मतदार यादीचा आगामी निवडणुकीत वापर करने आयोगाच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.




















