सोलापूर : आदिला नदी व नदी पात्र परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांकडून अंधाराचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्याचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. प्लास्टिक, बांधकामाचे अवशेष, घरगुती कचरा, तसेच दिवाळीतील फराळाचे उरलेले अन्नपदार्थ नदी परिसरात आणि पुलावरून फेकले जात आहेत. यामुळे नदी प्रदूषण वाढत असून परिसराची स्वच्छता आणि सौंदर्य धोक्यात आले आहे. या वाढत्या कचरा समस्येवर कठोर पावले उचलावीत अशी मागणी आदिला नदी व परिसर संवर्धन कृती समितीच्या वतीने महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे.
महापालिकेकडून प्रत्येक नगर, प्रभागात कचरा पेट्या उपलब्ध असतानाही काही नागरिक निष्काळजीपणे कचरा नदीकाठी टाकत आहेत. अशा कृत्यांमुळे स्वच्छता मोहिमेला धक्का बसत असून, स्थानिक पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे.
आदिला नदी व परिसर संवर्धन कृती समितीने केलेल्या मागणी आदिला नदी परिसर, विशेषतः वसंत विहार, स्वराज विहार, गोकुळ विहार आणि वेंकटेश्वरा सिटी परिसरात कचरा संकलन पेट्या तातडीने बसवाव्यात. परिसरात “कचरा फेकणे निषिद्ध आहे” असे फलक लावून जनजागृती करण्यात यावी. नदी परिसर घाण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अश्या प्रमुख मागण्या आहेत.
आदिला नदी व परिसर संवर्धन कृती समिती गेल्या काही महिन्यांपासून नदी स्वच्छता, वृक्षारोपण आणि जनजागृतीच्या विविध उपक्रमांत सक्रियपणे कार्यरत आहे. या पाठपुराव्यामुळे प्रशासनाचे लक्ष आता नदी परिसरातील वाढत्या प्रदूषणाकडे वळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी डॉ. उत्कर्ष वैद्य, गजानन बंडगर, महादेव चौरे, अजय उबाळे, राजू भोसले अन्य समिती सदस्य उपस्थित होते.
जर परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर नागरिकांमध्ये जागृतीसाठी समिती स्वतंत्र अभियान राबविणार आहे.
– समितीचे अध्यक्ष राजकिरण चव्हाण




















