जेऊर – विवाहनंतर चार वर्षाच्या मुलाबरोबरच कुटुंबाची जबाबदारी पार पाडत केडगाव तालुका करमाळा येथील तेजल बोराडे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात स्थान मिळवले असून त्यांच्या जिद्द चिकाटीसह त्यांचा संघर्षमय प्रवास इतरांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहे.
उमरड तालुका करमाळा येथील तेजल घनवट यांचे पोलीस होण्याचे स्वप्न शालेय जीवनापासून होतं. जुनियर कॉलेजला असताना एन.सी.सी मधील मुलींना पाहिल्यानंतर आपल्याही अंगावर खाकी वर्दी असावी असं त्यांना मनोमन वाटायचं वडिलांची परिस्थिती बेताची असल्याने बारावी शिक्षण झाल्यानंतर त्यांचा शेजारील असलेल्या केडगाव या गावातील महसूल सेवक असलेल्या सुनील बोराडे यांच्याशी विवाह झाला.
विवाह नंतर दोघांचा सुखी संसार सुरू झाला. त्यांना एक मुलगा झाला परंतु यांनी पाहिलेलं स्वप्न त्यांना गप बसू देत नव्हतं आपल्या पती जवळ त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली त्यांनी तिला पाठिंबा दिला. तुझी इच्छा असेल तर तू पुढे शिकत रहा आणि पोलिस भरतीसाठीही प्रयत्न करत रहा. माझं तुला नेहमी सहकार्य राहील. पतीचा खंबीर पाठिंबा मिळाल्यानंतर नव्या जोमाने तेजलने सुरुवात केली बाजारात पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी पुस्तके खरेदी करून घरीच सामान्य ज्ञान विषयाचा चांगला अभ्यास केला परंतु मैदानी चाचणीत आपण कमी तर पडणार नाही ना अशी शंका होती त्यानंतर पतीसह त्यांनी एक वर्षापूर्वी जेऊरवाडी येथील योद्धा करिअर अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. परंतु पूर्ण वेळ त्यांना तिथेही राहायला जमत नव्हतं या काळात त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागले कुटुंबाची जबाबदारी तर होतीच पण राजवीर नावाच्या छोट्या मुलाची ही जबाबदारी त्यांच्यावर होती तेजल यांना सासू-सासरे नाहीत त्यामुळे आई-वडिलांनी मुलाला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली.
कधी वडील कधी पती दररोज मैदान सरावासाठी ॲकडमीमध्ये मोटरसायकलवर सोडवायला घेऊन यायचे अनेक अडचणी यायच्या परंतु कष्ट करण्याची तयारी जिद्द आणि योद्धा अकॅडमीचे नवनाथ नाईक नवरे यांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आत्मविश्वास निर्माण झाला आणि नुकत्याच झालेल्या सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस भरती मध्ये त्यांना यश मिळवून त्यांची निवड झाली आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचा चीज झालं. या यशानंतर माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी घेतलेले कष्ट पतीने दिलेली खंबीर साथ आणि नाईकनवरेसरांच्या मार्गदर्शनामुळे मला हे यश मिळाल्याचे त्यांनी आवर्जून बोलून दाखवलं आहे.


























