बार्शी – येथील बार्शी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै. काकासाहेब तथा भगवंत पंढरीनाथ सुलाखे यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त सुलाखे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये भव्य तालुकास्तरीय इंग्लिश निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन रविवार दि. ७ डिसेंबर रोजी केले होते.
या स्पर्धेमध्ये चित्रकलेसाठी तीन गट केले होते. यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीचा एक गट, तिसरी व चौथीचा दुसरा गट व पाचवी ते सातवीचा तिसरा गट. अशा तीन वयोगटात ही स्पर्धा संपन्न झाली. तर इंग्लिश निबंध स्पर्धा ही इयत्ता आठवी ते दहावी या वयोगटामध्ये संपन्न झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख अतिथी बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अनंत कवठाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर प्रसन्न देशपांडे, कुंभार, वाघमारे, सुलाखे इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक तुषार महाजन, सौ बेताळे, इंग्लिश निबंध स्पर्धेचे परीक्षक साजिद बागवान चित्रकला स्पर्धेचे परीक्षक श्रीनिवास मारडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. प्रमुख अतिथी कवठाळे आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांचा विकास केला पाहिजे, असे सांगून कै. काकासाहेब सुलाखे यांच्या कार्याविषयी मुलांना माहिती दिली. या स्पर्धेला बार्शी शहर व तालुक्यातून उदंड प्रतिसाद मिळाला. दोन्ही स्पर्धेला मिळून जवळपास २५० ते ३०० स्पर्धकांनी आपली हजेरी लावली.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी गणेश जोशी, अमोल कुलकर्णी, उमेश चव्हाण, कांबळे, गुंड, सौ. जोशी, सौ. ठोंगे, सौ. होनराव, सौ. चव्हाण आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले . सूत्रसंचालन कांबळे यांनी केले तर आभार सौ. चव्हाण यांनी मानले.
















