सांगोला – शेतकरी कामगार पक्षाचे माजी आ.स्व.गणपतराव देशमुख यांच्या घरावर शुक्रवार दि.१० ऑक्टोंबर रोजी दुपारी भ्याड करण्यात आला. याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाकडून शनिवार दि.११ ऑक्टोंबर रोजी सांगोला बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार सांगोला शहरासह तालुका बंद ठेवून निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर निषेध मोर्चाची सुरुवात महात्मा फुले चौक येथून करण्यात आली. यावेळी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. निषेध मोर्चामध्ये विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सांगोला तहसील कार्यालय समोर झालेल्या भाषणात बाबुराव गायकवाड, बापूसाहेब ठोकळे, महादेव घोंगडे, शिवाजी बनकर, कल्पना शिंगाडे, अरविंद केदार, नवनाथ पवार, अतुल पवार, नंदकुमार शिंदे, मच्छिंद्र काळे, संदीप काळे, प्रभाकर कसबे, तुषार इंगळे, दत्ताभाऊ चव्हाण, अजितसिंह पाटील, सरगर मॅडम, नागेश जोशी यांनी घडलेल्या घटनेचा निषेध करीत प्रशासनाने या घटनेतील हल्लेखोर कोण आहे त्याचा तातडीने शोध घेतला पाहिजे. अशा हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी व यापुढे असे प्रकार घटना घडणार नाहीत याची प्रशासनाने दक्षता घ्यावी असे मनोगत व्यक्त केले.

राज्यात अतिवृष्टीमुळे अजूनही दुष्काळाचे सावट आहे. समोर काही दिवसावर दिवाळीचा सण आहे. असे असताना या घटनेच्या निषेधार्थ सांगोला बंद ठेवणे उचित नव्हते. परंतु सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाने व विविध पक्षातील नेते मंडळी, कार्यकर्ते यांनी सांगोला बंदसाठी व निषेध मोर्चा व रॅलीसाठी साथ दिली, पाठिंबा दर्शवला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी असे निंदनीय कृत्य करणाऱ्या व्यक्तीला व ते कृत्य करायला लावणाऱ्या व्यक्तीला पोलीस प्रशासनाने तात्काळ शोधून समज द्यावी व त्याचे नाव आमच्या शिवाय इतर कोणालाही सांगू नये असे मनोगत केले.
सांगोला तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाला विचार करायला लावणारी सदर घटना आहे. स्व.आबासाहेबांनी सुसंस्कृत राजकारणाची दिशा दिली. भविष्यात आम्ही जनतेला विसरणार नाही. राजकारण करायचेच असेल तर समोरासमोर येऊन करा. तालुक्याचे राजकारण व समाजकारण सुसंस्कृत ठेऊया. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही असे अभिवचन डॉ.अनिकेत देशमुख यांनी यावेळी दिले.
चौकट-
दि.१० ऑक्टोंबर रोजी सांगोला शहरात निघालेल्या रॅलीदरम्यान स्व.आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर अज्ञात इसमांनी भ्याड हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असून, हा प्रकार अत्यंत निंदनीय व लोकशाहीविरोधी आहे. या घटनेचा आम्ही सर्वपक्षीय पातळीवर तीव्र निषेध व्यक्त करतो. सांगोला तालुक्यातील सर्व जनतेत संतापाची भावना निर्माण झालेली असून, या अज्ञात इसमांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आम्ही या निवेदनाद्वारे शासन व प्रशासनाकडे मागणी करीत आहोत. लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे व सामाजिक सलोखा अबाधित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी सर्वपक्षीय मागणी आहे, असे निवेदन तहसीलदार संतोष कणसे व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना देण्यात आले.