परभणी – परभणी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणारा सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग’ (Center for Invention, Innovation, Incubation and Training )(CIIIT) प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असून, हा उपक्रम पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळे मंजूर झाला आहे.
या सुमारे ११५ कोटी रुपयांच्या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे ३,००० विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ४.० युगाशी सुसंगत अत्याधुनिक तांत्रिक व उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार असून परभणीला कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळक स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सीआयआयआयटीआय केंद्रामुळे परभणी आणि आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ४.० या साठी लागणारे कौशल्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेता येणार आहे, ज्यामुळे स्थानिक तरुणांची रोजगारक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. मंत्री मेघना बोर्डीकरांनी ग्रामीण युवकांना शहरांकडे स्थलांतर न करता आपल्या जिल्ह्यातच गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध व्हावा, हा दृष्टिकोन पुढे ठेवून हा प्रकल्प पुढे नेला आहे.
केवळ कौशल्य विकासापुरते मर्यादित न राहता मेघना बोर्डीकरांनी परभणीसाठी आयटी आणि स्टार्टअप क्षेत्रातही नवे दालन उघडले आहे. सेलू परिसरात सॉफ्टवेअर कंपन्यांची पावले वळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातूनच आयटी क्षेत्रात करिअर करण्याची संधी निर्माण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.
तरुणांनी “नोकरी शोधणारे” न राहता “नोकरी निर्माण करणारे” व्हावे, या उद्देशाने देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशनच्या माध्यमातून नवउद्योजकांना मार्गदर्शन, मेंटॉरशिप आणि आवश्यक पाठबळ देणारे विविध उपक्रम राबवले जात आहेत.
महिला सक्षमीकरण हा मेघना बोर्डीकरांच्या विकासदृष्टीचा आणखी एक महत्त्वाचा स्तंभ आहे. महिला बचत गटांना जोडून ‘लखपती दीदी’ संकल्पनेशी सुसंगत कौशल्य प्रशिक्षण, घरगुती व लघुउद्योगांसाठी मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे ग्रामीण महिलांचे उत्पन्न आणि आत्मविश्वास दोन्ही वाढत आहेत.
पाणी, शेती, शिक्षण, आरोग्य या पारंपरिक विकासघटकांसोबत कौशल्य, स्टार्टअप आणि महिला सक्षमीकरण यांची सांगड घालून परभणीसाठी दीर्घकालीन विकासाचा रोडमॅप मेघना बोर्डीकरांनी मांडला आहे.
सीआयआयआयटीआय केंद्र, ग्रामीण आयटी संधी, स्टार्टअप संस्कृती आणि महिला उद्योजकतेचा मजबूत पाया या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून “कौशल्यशाली, आत्मनिर्भर आणि प्रगत परभणी” हे मेघना बोर्डीकरांचे स्वप्न आकार घेत आहे. विरोधकांच्या टीकेकडे न पाहता विकासाच्या अजेंड्यावर ठामपणे काम करणाऱ्या या तरुण नेत्या आता परभणीच्या भविष्यासाठी आश्वासक प्रतीक म्हणून पुढे येत आहेत.
सदर सीआयआयआयटीआय सेंटरला मंजुरी मिळविण्यासाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी,रजिस्ट्रार श्री. वेणीकर आणि परभणी अस्ट्रॉनोमिकल सोसायटी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे.























