तभा फ्लॅश न्यूज/वाशी : पवनचक्की प्रकरणात खून, खंडणी, हनामारी, धक्क्याने महाराष्ट्र हादरला आहे. राज्यभर पवनचक्की हा चर्चेचा विषय झाला असून थांबण्याचे नाव घेत नाही. कंपन्यांकडून व त्यांच्या ठेवण्यात आलेल्या दलाल, गुंडाकडून शेतकरी, नागरिकांना धमकावले जाते त्यामुळे शेतकरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कंपन्यांकडून कधी शेतकऱ्यांची नुकसान करण्यात येते तर कधी शासनाची असाच धक्कादायक प्रकार आता समोर येत आहे. त्यांची मजल आता थेट वनविभागाच्या जागेवर गेली आहे. कुठल्याही परवानगी न घेता वनविभागाच्या जागेतून रस्ता तयार केल्याची गंभीर बाबत समोर येते.
वनविभागाच्या आणि पवनचक्की कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केला जाऊ लागला. सविस्तर माहिती अशी की, वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी या शिवारात टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीकडून पवनचक्की उभारण्याचं काम सुरू आहे. या शिवारात टाटा कंपनीचे जवळपास चार ते पाच पॉईंट असल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी बेकायदेशीर मोठं उत्खनन केलं जातं असून शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमाची पायमल्ली केली जाते. त्या ठिकाणी आणखी गंभीर प्रकार समोर आला. कडकनाथवाडी शिवारात ज्या ठिकाणी पवनचक्की उभा करण्याचे काम सुरू आहे. त्यापासून काही अंतरावर एकीकडे धाराशिव जिल्ह्याची जिल्हा सरहद्द संपते तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याची जिल्हा सरहद्द सुरू होते.
सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर बार्शी तालुक्यातील चुंब, धामणगाव आहे. या गावाच्या शिवेपासून सोलापूर वन विभागाचे रिझर्व फॉरेस्ट सुरू होते. येथून बार्शी तालुक्याची सुरुवात होते. धाराशिव जिल्ह्यातील कडकनाथवाडी व सोलापूर जिल्ह्यातील चुंब, धामणगाव या दोन्ही गावची शिव आहे. अन येथून जवळच टाटा पवनचक्की कंपनीकडून पवनचक्की उभी केली जात आहे.
अवजड साहित्याची वाहतूक करण्यासाठी किंवा इतर वेळी जा-ये करण्यासाठी कंपनीकडून जवळच असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील वन विभाग रिझर्व फॉरेस्ट च्या जागेवर मोठं अतिक्रमण करत रस्ता केला असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. टाटा कंपनीकडून सोलापूर वनविभागाची कसलीही परवानगी न घेता रस्ता आणि शासनाच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. पवनचक्कीचे थेट वन विभागाच्या जागेवरती अतिक्रमण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात एक खळबळ उडाली आहे. कंपनीने हा प्रकार परस्पर केली की, यामागे कोणाचा हात आहे अशी परिसरात चर्चा जोर धरू लागली.
सामान्य माणसाने वन विभागाच्या झाडाच्या फांद्या तोडल्या किंवा जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विभागाकडून कडक शासन केलं जातं मग टाटा कंपन्यांकडून शासनाच्या इतक्या मोठ्या मालमत्तेचे नुकसान केलं जातं असताना वन विभाग गप्पा असण्या मागची नेमकी भूमिका काय? सोलापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का? आली तर काय कारवाई करणार? हे पाहणे गरजेचे आहे.
सोलापूर जिल्ह्यातील वन विभागाच्या रिझर्व फॉरेस्ट पासून काही अंतरावर उभा राहत असलेली ही पवनचक्की बेकायदेशीर तर नाही ना? असेल तर परवानगी कोणी दिली? धाराशिव जिल्ह्यातील कडकनाथवाडी येथे पवनचक्की उभारण्यासाठी परस्पर बार्शी तालुक्याच्या हद्दीत असलेल्या वन विभागाच्या जागेत रस्ता केल्यानं वन विभाग अन बार्शी तालुका प्रशासन कारवाई करणार का? तसेच पवनचक्की उभा करण्यासाठी लागणाऱ्या इतर परवानग्या कंपनीकडे आहेत की नाहीत? हे पाहणे देखील गरजेचे आहे. यानिमित्ताने असे सवाल उपस्थित राहत आहे.
पिरजादे वनपाल पांगरी (तालुका बार्शी)
पवनचक्की कंपनीने केलेला रस्ता, अतिक्रमण याची पाहणी आमच्या कर्मचाऱ्यांनी केली. त्याठिकाणी कंपनीने वन विभागाच्या जागेतून रस्त्या केल्याचे प्रत्यक्ष दर्शी दिसून आले. त्यामुळे आम्ही वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून कंपनीवर पुढील योग्य ती कारवाई करू.


























