सोलापूर : अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात नवा मैलाचा दगड ठरत, एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव यांच्या वतीने 31 जानेवारी 2026 रोजी TEDxSinhgad COE 2026 अंतर्गत “ट्रेड एक्स 2026” या विशेष कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सोलापूर पंचक्रोशीमध्ये प्रथमच TEDx संकल्पनेअंतर्गत झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला.
कार्यक्रमाची यंदाची संकल्पना “Educating AI – कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील शिक्षण, विचार व कौशल्यांची जडणघडण” अशी होती. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात शिक्षण, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, उद्योजकता आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर सखोल व प्रेरणादायी मंथन झाले.
या TEDx Talk मध्ये पाच विविध क्षेत्रांतील मान्यवर वक्त्यांनी आपले विचार मांडले.
कॉर्पोरेट ट्रेनर डॉ. अर्शद सय्यद, लेखक अतुल कहाते, इन्फ्लुएंसर मंदार पाडवळ, उद्योजिका ऐश्वर्या यादव आणि उद्योजक मुदस्सर अली रंगरेज यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढती भूमिका, भविष्यातील करिअर संधी आणि विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयाच्या कौशल्यांवर मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांमध्ये नवविचारांची चैतन्यपूर्ण ऊर्जा निर्माण झाली.
या कार्यक्रमाला 150 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसह विविध वयोगटातील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच फोक ऑर्केस्ट्रा, समूह गायन व समूह नृत्य अशा सांस्कृतिक सादरीकरणांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी जाधव आणि ऐश्वर्या यादव यांनी केले. संपूर्ण आयोजनाची धुरा प्रा. डॉ. प्रदीप तपकिरे आणि त्यांच्या विद्यार्थी टीमने समर्थपणे सांभाळली. या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले तसेच कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सोलापूर शहरात प्रथमच TEDx संकल्पनेतून साकार झालेला हा भव्य उपक्रम संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील एक ऐतिहासिक क्षण ठरला असून, विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठाशी जोडणारा, भविष्याभिमुख दृष्टिकोन देणारा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सक्षम बनवणारा ठरला आहे.
























