बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी “गुजराती ठग असतात” असे आक्षेपार्ह विधान केले होते. याप्रकरणी त्यांनी दिलेला माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलाय. तसेच त्यांच्या विरोधातील फौजदारी बदनामीची तक्रारही रद्द करण्यात आलीय. न्या. अभय ओक आणि न्या. उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने आज, मंगळवारी हा निकाल दिलाय.
तेजस्वी यादव यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये विधान केले होते की, ‘सध्याच्या परिस्थितीत फक्त ‘गुजराती’च ठग असू शकतात आणि त्यांची फसवणूकही माफ केली जाईल. त्यानंतर गुजरातचे रहिवासी हरेश मेहता यांनी तेजस्वी यादव यांच्या विरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. तेजस्वी यांच्या वक्तव्यामुळे गुजरातींची बदनामी झाल्याचा आरोप मेहता यांनी केला होता. गेल्या आठवड्यात याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तेजस्वी यादव यांच्या माफीनाम्याची दखल घेत निर्णय राखून ठेवला होता.
तेजस्वी यादव यांनी यापूर्वी दाखल केलेल्या माफीनामा पत्रावर सर्वोच्च न्यायालय समाधानी नव्हते. कोर्टाने त्याला पुन्हा स्पष्ट माफी मागायला सांगितल्यावर तेजस्वीने त्यानुसार बिनशर्त माफी मागितली होती. अखेर याप्रकरणी आज, मंगळवारी न्या. अभय ओक आणि न्या. उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने तेजस्वी यादव यांचा माफीनामा मंजूर करत त्यांच्या विरोधातील फौजदारी मानहानी तक्रार रद्द करण्याचे आदेश दिलेत.


















