जालना – जाफराबाद तालुक्यातील ५० गावांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयाची इमारत सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे. रुग्णालयाची इमारत पूर्णतः जीर्ण झाली असून, नवीन इमारतीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागात वर्षभरापासून धूळखात पडला आहे. परिणामी, जीव मुठीत घेऊन डॉक्टर उपचार करत आहेत, तर रुग्ण भीतीच्या छायेत उपचार घेत आहेत.
टेंभुर्णी हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण असल्याने परिसरातील ५० गावांसाठी हे ३० खाटांचे रुग्णालय मुख्य आधार आहे. १९८८ मध्ये बांधलेल्या या इमारतीची गेल्या तीन दशकांत मोठी डागडुजी झालेली नाही. सद्यस्थितीत भिंतींना मोठे तडे गेले असून, स्लॅबचे प्लास्टर पडत आहे. पावसाळ्यात छतावरून होणारी गळती, खिडक्यांची तुटफूट आणि जीर्ण झालेली धोकादायक वीज वायरिंग यामुळे येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुविधांचा बोजवारा आणि कर्मचाऱ्यांची हेळसांड रुग्णालयात ६ वैद्यकीय अधिकारी आणि २५ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्यासाठी निवासस्थाने उपलब्ध नाहीत. ऑन ड्युटी डॉक्टरांसाठी स्वतंत्र वॉशरूम नाही. दोन सफाई कामगारांची पदे रिक्त असल्याने आणि ड्रेनेज लाईन चोकअप झाल्याने स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे.
वॉर्डमध्ये दुर्गंधी, माश्यांचा प्रादुर्भाव आणि मोडक्या खाटा यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. या गैरसोयींमुळे रुग्ण आता खाजगी दवाखान्यांकडे वळत आहेत. प्रशासकीय उदासीनता याबाबत वैद्यकीय अधीक्षक उमेश जाधव म्हणाले, “इमारत आणि ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
नवीन इमारतीचा प्रस्ताव मागील वर्षीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला आहे, मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही.” दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. प्रशासनाच्या या बेफिकीरीमुळे ग्रामीण जनतेतून संताप व्यक्त होत असून, तातडीने नवीन इमारत मंजूर करण्याची मागणी होत आहे.

















