लष्कराच्या गोळीबारानंतर जंगलात पळाले जिहादी
श्रीनगर, 07 जुलै (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाल्यानंतर संतप्त झालेल्या दहशतवाद्यांनी राजौरी येथील लष्कराच्या तळावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यावर लष्कराच्या जवानांनी लगेच प्रत्युत्तर दिले.दहशतवादी जंगलात पळून गेले. लष्कर आणि पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे.
जम्मू-काश्मिरात शनिवारी दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले. तर दोन जवानांनी हौतात्म्य पत्करले. चकमकीनंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने घटनास्थळी 4 दहशतवाद्यांचे मृतदेह पडल्याचे आढळून आले. मात्र, गोळीबार सुरूच असल्याने मृतदेह बाहेर काढता आले नव्हते. या गोळीबारानंतर जिहादी दहशतवादी तेथून लगेच पळून गेले होते. लष्कर आणि पोलीस संयुक्तपणे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत आहेत. रियासी येथे भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने दहशतवाद्यांचा पूर्ण ताकदीनिशी खात्मा करण्याचे आदेश दिले होते.
त्याचवेळी, जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, किमान 70 विदेशी दहशतवादी सक्रिय आहेत. गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय सैन्य सातत्याने ऑपरेशन करत आहे. लष्कराने शनिवारी चिनागाम गावाभोवती शोधमोहीम राबवली होती. मात्र, कारवाई सुरू होताच गोळीबार सुरू झाला. लष्कराचे दहशतवादी येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दल आले आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले. तेथे 4 दहशतवादी मारले गेले होते. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आज, रविवारी दहशतवाद्यांनी सैन्य तळावर हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जातेय.