पंढरपूर – ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसास सहकार शिरोमणी कारखाना जिल्ह्यात उच्चांकी दर देणार असून, मागील पाच-सहा वर्षात कारखाना आर्थिक अडचणीतून मार्गक्रम करीत असतानाही केवळ शेतकऱ्यांच्या घामाला योग्य् दाम देण्यासाठी आम्ही सर्व संचालक सतत प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. यापुर्वीही केवळ शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवुन, एफआरपी पेक्षा जादा दर देण्यात आला असल्याचे चेअरमन केल्याणराव काळे यांनी सांगितले.
सहकार शिरोमणी कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या २६ वा गळीत हंगाम शुभारंभ चेअरमन कल्याणराव काळे व ओंकार शुगर कार्पोरेशन प्रा.लि. युनिट नं.१ ते १७ चे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील व संचालिका सौ.रेखाताई बोत्रे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन करण्यात आला. तत्पुर्वी संचालक तानाजी उमराव उर्फ रावसाहेब सरदार व त्यांच्या पत्नी सौ.राजश्रीताई सरदार या उभयतांच्या हस्ते बॉयलर पुजन व संचालक राजाराम जगदाळे व त्यांच्या पत्नी सौ.रंजना जगदाळे या उभयतांच्या हस्ते गव्हाण व काटापुजन करण्यात आले. यावेळी श्रीविठ्ठल व सहकार शिरोमणी वसंतदादांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित सर्व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
कल्याणराव काळे पुढे म्हणाले आपल्या भागातील बेरोजगारांना काम मिळावे, १४ महिने कष्ट करुन पिकविलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसास चांगला दर मिळावा म्हणुन दुरदृष्टीने स्व्. वसंतदादांनी अथक परिश्रमातुन भाळवणीच्या माळराणावर या कारखान्याची उभारणी केली. त्यांना तत्कालीन अनेक सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. दादांचे आचार विचारांचा वारसा आम्ही जपत असून, मागील पाच-सहा वर्षात कारखाना आर्थिक अडचणीत असताना संस्था टिकुन रहावी, शेतकऱ्यांना वेळेत आणि जास्तीत-जास्त् दर देता यावा केवळ सर्व सभासद, कामगार या सर्वाचे हित डोळ्यासमोर ठेवुन, सुमारे १६ कारखाने चालविण्याचा अनुभव असणारे ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा चेअरमन मा.श्री.बोत्रे-पाटील यांचे सहकार्याने सहयोगी तत्वावर हा कारखाना चालविला जाणार आहे. सहयोगी तत्वानुसार आपल्या सभासदांचे, कामगारांचे, संचालक मंडळाचे सर्व हक्क् अबादित राहणार असून, त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाही. कारखाना भाडे तत्वावर किंवा भागीदारीमध्ये दिलेला नसून शासनाचे जीआरनुसार शासनाच्या अटी व शर्तीस अधिन राहुनच सहयोगी तत्वावर चालविण्यात येणार आहे. आपण वार्षिक सभेमध्ये दिलेल्या मंजुरीने झालेल्या निर्णयावर शासकीय समितीमध्ये याचा निर्णय होणार असून, त्यास काही महिने लागणार आहेत. हे सर्व कामकाज शासनाच्या नियमांचे चौकटीत राहुनच करण्यात येत आहे. काही मंडळी मिडीयाव्दारे, पत्रकार परिषद घेवुन, स्वार्थासाठी कारखाना अडचणीत आणण्यासाठी अटोकात प्रयत्नात आहेत. परंतु विरोधकांच्या अपप्रचाराचा विचाराचा न करता सिझनमध्ये जास्तीत जास्त् क्रशिंग करुन, आपल्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना वेळेत आणि जास्तीत-जास्त् ऊसाला दर कसा देता येईल याचाच विचार आम्ही सर्व संचालक सतत करीत आहोत. आपणास न मागता दिपावली सणासाठी सवलतीच्या दरातील ५० किलो साखर, शंभर रुपयाचा दुसरा हप्ता देण्यात आलेला आहे. यासाठी आवश्यक ते सहकार्य व कोणताही करार न करता केवळ आपल्या सर्वावर विश्वास ठेवुन यंदाचा गळीत हंगाम चालु करण्यासाठी ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बोत्रे-पाटील यांनी कोट्यावधी निधी दिला असून, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करुन, विश्वास पात्र राहण्याची ग्वाही यावेळी दिली.
यावेळी ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा बोत्रे-पाटील म्हणाले दिवंगत नेत्यांनी अथक परिश्रमाने कारखाने उभारलेले आहेत ते बंद न पडता सुरळीत चालु राहुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व कामगारांना त्यांच्या कष्टाचे व कामाचे दाम मिळावे व लवकरात लवकर हे कारखाने कर्जमुक्त व्हावेत या उद्देशाने ओंकार ग्रुप काम करीत आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही वजन काट्यावर वजन करुन या कारखान्यास ऊस गळीतास आणावा, वजनात तफावत होणार नाही असे सांगुन, चालु गळीत हंगामामध्ये ५.५० लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट असून, प्रत्येक १५ दिवसांनी गळीतास आलेल्या ऊसाचे पेमेंट, ऊस तोडणी वाहतुकदारांचे पेमेंट व कामगारांना दरमहा पेमेंट करण्याची ग्वाही दिली. आम्ही ऊसास दर देण्यास मागे राहणार नाही, आपणही ऊस गळीतास आणण्यास थोडा विलंब झाल्यास थांबुन आपला संपुर्ण ऊस इतर कारखान्या गळीतास न देता सहकार शिरोमणी कारखान्यास गळीतास देण्याचे आवाहन करुन गळीत हंगामास शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे यांनी चालु गळीत हंगामात विक्रमी गाळप करण्यात येणार असून, त्याप्रमाणे दैनंदिन गाळप चार ते साडेचार हजार मे.टन होण्यासाठी ऊस तोडणी व वाहतुक यंत्रणी सज्ज असून, मशिनरी देखभाल दुरुस्तीचे कामे पुर्ण झाली आसल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.समाधान काळे यांनी केले तर आभार संचालक युवराज दगडे यांनी केले
यावेळी कारखान्याचे सर्व आजी, माजी संचालक, सभासद शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार व कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















