बार्शी – बार्शी शहरातील एका किराणा दुकानात खरेदीचा बहाणा करुन ९१ हजार रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.
घटना ७ मे २०२५ रोजी सकाळी सुमारास घडली. लक्ष्मीनगर येथील रहिवासी रमेश जवरीलाल बाफना यांच्या दुकानात एक अनोळखी व्यक्ती खरेदीच्यानिमित्ताने आली. दुकानदारांची नजर चुकवून तिने काउंटरवरील पैसे असलेली बॅग उचलली व पळ काढला. बॅगेत ९१ हजार रुपयांची रोख रक्कम होती. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४८/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड संहिता कलम ३८० अंतर्गत कारवाई सुरु करण्यात आली. तपासाची जबाबदारी पोलीस नाईक मुळे यांच्याकडे सोपवण्यात आली.
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाला वेग दिला. १५ सप्टेंबर रोजी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल उदार आणि बाळकृष्ण मुठाळ यांनी उपळाई रोडवर गस्त घालत असताना संशयित व्यक्ती सीबीझेड मोटारसायकलवर तोंड बांधून फिरताना दिसली. फिर्यादीच्या वर्णनाशी आणि सीसीटीव्ही फुटेजशी जुळणाऱ्या या व्यक्तीचा पाठलाग करुन पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी सतर्कता दाखवून त्याला ठाण्यात आणले. पुढील तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी अशोक सायकर आणि निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली. पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल माने, साठे, पोलीस नाईक मुळे, कॉन्स्टेबल मुठाळ, उदार, जाधव, पवार, देशमुख, शेख, उघडे आणि भांगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.