देगलूर / नांदेड : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांच्या छाननीनंतर वैध ठरलेल्या 102 नगरसेवक पदासाठी व 5 नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांना निवडणूक सूचनांचे आज (सोमवारी) रोजी सभेचे आयोजन करुन मार्गदर्शन करण्यात आले.
आज (24 नोव्हेंबर) रोजी सकाळी 11.00 वाजता नगरपरिषद सभागृहात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस एकूण 107 उमेदवार व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुप पाटील यांनी भूषविले तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सौ. निलम कांबळे उपस्थित होत्या. या बैठकीत उमेदवारांना निवडणूक आचारसंहितेचे पालन, निवडणूक खर्चाचे नियम, मर्यादा व सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती आणि निवडणूक कार्यक्रमानुसार पुढे पार पडणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेचे स्पष्टीकरण यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थित उमेदवारांनी निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या विविध प्रश्नांना निवडणूक अधिकाऱ्यांनी शंकांचे निरसन करण्यात आले तसेच त्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आले. या निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्तबद्धता राखण्यासाठी घेतलेली ही बैठक अत्यंत सकारात्मक आणि फलदायी ठरली असून आगामी निवडणूक उत्साहात आणि कायदेशीर चौकटीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.



















