सांगोला – कोण कोणाला रुपया लवकर काढून देत नाही…हे वाक्य बऱ्याचदा आपल्या कानी पडतं. परंतु आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. हे ज्याला माहिती असतं, तो योग्य वेळ आली की सामाजिक भान ठेऊन फुल नाही, फुलाची पाकळी का होईना देण्यासाठी पुढे येत असतो.
याचे उदाहरण द्यायचे झाले तर बुधवार दि.२९ ऑक्टोबर रोजी घडलेला हा प्रसंग…सांगोल्यातील आपुलकी प्रतिष्ठानचे सचिव संतोष महिमकर हे मेडिकल दुकानात काम करत असताना एका व्यक्तीने त्यांची भेट घेतली. आणि आपल्या घरातील सुट्ट्या पैशांचा गल्ला न फोडताच त्यांच्याकडे सुपूर्त केला आणि या गल्ल्यातील बचतीची रक्कम मोजलेली नाही, जी काही रक्कम निघेल, ती आपुलकी प्रतिष्ठानला देणगी म्हणून घ्या असे सांगून आपले नाव न सांगण्याच्या अटीवर ते निघून गेले. ते सद्गृहस्थ गेल्यानंतर संतोष महिमकर यांनी तो गल्ला फोडून चिल्लर मोजली तेव्हा ती रक्कम २ हजार ३६० रुपये इतकी भरली.
आपल्या घासातला घास काढून देण्याची तयारी जेव्हा होते, तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगत असतो याची जाणीव नक्कीच होते.
आपुलकी प्रतिष्ठान ही संस्था समाजातील तळागाळापर्यंत पोहोचून एक प्रभावी असं समाजकार्य तालुक्यात करत असल्याचे सर्वांच्याच निदर्शनास येत आहे. त्यामुळे सध्या देणगीदारांचीही संख्या वाढल्याचे दिसत आहे. आणि अशा देणगीदारांच्या बळावरच आपुलकीचा आत्मविश्वास वाढीस लागला असून आपुलकीचे कार्य बहरत आहे.
-राजेंद्र यादव, अध्यक्ष, आपुलकी प्रतिष्ठान


















