वसमत / हिंगोली – नगरपरिषद निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत सुनिता मनमोहन बाहेती या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यांच्या व आमदार राजू भैया नवघरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १७ नगरसेवक सत्तेत आले असून, पदभार स्वीकारताच त्यांनी शहरातील १५ ते २० वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या भागांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
त्याचाच एक ठळक परिणाम म्हणजे कबूतर खाना परिसरात तब्बल २० वर्षांनंतर प्रथमच घंटागाडीची घंटी वाजली. अनेक दशकांपासून येथे नियमित कचरा संकलनाची कोणतीही व्यवस्था नव्हती. रस्त्यांवर साचलेला कचरा, दुर्गंधी, डासांचे साम्राज्य आणि आरोग्याच्या समस्या नागरिकांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनल्या होत्या.
नगराध्यक्षा सुनिता मनमोहन बाहेती व त्यांच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७ नगरसेवकांनी शहरातील स्वच्छता प्रश्नांना प्राधान्य देत तात्काळ प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानुसार घंटागाडी सेवा या परिसरात सुरू करण्यात आली. २० वर्षांनंतर प्रथमच घंटीचा आवाज ऐकून अनेक ज्येष्ठ नागरिक भावूक झाले, तर महिलांनी समाधान व्यक्त केले.
मात्र या समाधानासोबतच आता नागरिकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे घंटागाडी रोज येणार का?
स्थानिक नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे की, ही सेवा केवळ निवडणुकीनंतरचा देखावा न राहता दररोज, ठराविक वेळेत व कायमस्वरूपी सुरू ठेवली पाहिजे. स्वच्छता ही मूलभूत गरज असून त्यात कोणतीही तडजोड होऊ नये, अशी ठाम मागणी होत आहे.
नगराध्यक्ष सुनिता मनमोहन बाहेती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व १७ नगरसेवकांकडून आता या संदर्भात ठोस निर्णय, नियमित नियोजन आणि सतत अंमलबजावणीची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. जर ही सेवा सातत्याने सुरू राहिली तर कबूतर खाना परिसरासह शहरातील इतर दुर्लक्षित भागांसाठीही हा निर्णय एक नवा आदर्श ठरेल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
























