ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अंमली पदार्थ तयार करणाऱ्यांपासून ते ललित पाटीलला फरार होण्यास मदत करणाऱ्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. या ड्रग्ज रॅकेटमागील अनेक धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. मास्टरमाइंड अरविंद लोहारे, भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्यासह ११ आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून यामध्ये आता ससून रुग्णालयातील डॉक्टरला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सोमवारी रात्री पुणे पोलिसांनी कारवाई केली. ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. आज त्यांना कोर्टात हजर केलं जाऊ शकत.
ड्रग्ज तस्कर ललित पाटील हा गेले ९ महिने ससून रुग्णालयात उपचार घेत होता. त्यादरम्यान त्याचा ससून रुग्णालयात मुक्काम वाढवा यासाठी डॉ देवकाते यांनी कागदोपत्री प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ललित पाटीला उपचारांची गरज असल्याचे सांगत डॉ देवकाते यांनी ९ महिन्यांपासून त्याचा मुक्काम वाढवत नेला होता. अशा अनेक बाबी आता समोर येत आहेत. त्यासोबत ससून रुग्णालयाच्या १६ नंबर वॉर्डमध्ये अनेक व्हीआयपी आरोपी उपचार घेत होते. त्याच्यासाठी देखील देवकाते यांनी प्रयत्न केले होते का? याचा तपास आता केला जात आहे.
याआधी, ललित पाटीलला येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या येरवडा कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सोमवारी अटक केली. डॉ. संजय मरसाळे असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.