सोलापूर : प्रभाग 26 मधील रुबी नगर ते अमोल नगर येथील रस्ता करावा तसेच ड्रेनेज लाईनची समस्या दूर करावी या मागणीकडे लक्षवेधत महापालिका निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा देत या रस्त्यावरच निषेध आंदोलन केले. महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या आश्वासनानंतर अखेर हा बहिष्काराचा निर्णय मागे घेण्यात आला. सायंकाळी येथील रहिवाशांनी मतदान केले.
केल्या अनेक वर्षापासून रुबी नगर ते अमोल नगर या रस्त्याची दुरावस्था आहे यामुळे या रस्त्यावरून ये जा करणे तसेच वाहन चालविणे मोठे अडचणीचे ठरत आहे. वयोवृद्ध, रुग्ण यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रस्त्याच्या समस्यामुळे या नगरात घरापर्यंत ॲम्बुलन्स आणता येत नाही. एखाद्याचे निधन झाल्यास चादरीतून गुंडाळून मृतदेह ॲम्बुलन्स पर्यंत आणावा लागतो. राजकीय दबावामुळे या रस्त्याचे काम करण्यात येत नाही असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. ड्रेनेजची समस्या गंभीर आहे. पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरते. या समस्या संदर्भात महापालिका आयुक्त, नगरसेवक, आमदार यांच्यापर्यंत तक्रारी केल्या. पाठपुरावा केला. तरीही गेली आठ वर्षे झाले कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे मतदान कशासाठी करायचे ? मतदान करून काय उपयोग? कामे होत नसतील तर नागरिकांनी जायचे कुठे? यामुळे अखेर बहिष्काराचा निर्णय घेतला, अशी व्यथा येतील नागरिकांनी मांडली.
दरम्यान, या संदर्भात माहिती मिळताच महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याशी चर्चा करून अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी येथील रहिवाशांची भेट घेतली. रस्ता आणि ड्रेनेजचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात दोन दिवसातच महापालिकेत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यानंतर येथील महिला व नागरिकांनी अखेर बहिष्काराचा निर्णय मागे घेतला आणि सायंकाळी पाचच्या सुमारास येथील सुमारे तीनशेहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला,अशी माहिती ॲड. नीता जोशी यांनी दिली.























