सोलापूर : चार दिवसांपूर्वी दारू पिण्यासाठी पैसे मागून दोघांनी एकाचा खून केला. हा प्रकार विजापूर नाका परिसरात घडला. न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाली, त्यानंतर निवेदन पंचनामा करण्यासाठी आरोपींना नेताना अचानक पोलिसांचे वाहन बंद पडले. त्यानंतर हातात बेड्या घातलेल्या आणि दोरीने (सोल) बांधलेल्या आरोपींना रस्त्याने पायी चालवत नेले. या सा-या प्रकारामुळे सोलापुरकरांना जुन्या काळाची आठवण झाली. आरोपींना रस्त्यावर थांबलेलले लोक शिवीगाळ करत होते.
आकाश तुळजाराम बलरामवाले व नवल खरे (दोघे रा. गरीबी हटाव झोपडपटी नंबर एक, विजापूर रोड, सोलापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. तर यतिराज दयानंद शंखे (वय 36 , रा. गरीबी हटाव झोपडपट्टी नंबर एक, सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवार 17 ऑक्टोबरच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शंखे यांच्या घरासमोर भांडणाचा आवाज येऊ लागला. यामुळे मयत तरुणाची पत्नी प्रतिभा या तेथे गेल्या. त्यावेळी आरोपी आकाश आणि नवल असे दोघे यतिराज यांना हाताने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करताना दिसले. प्रतिभा यांचे प्रती यतिराज यांच्याकडे आरोपींनी दारुसाठी पैशाची मागणी केली होती, परंतु पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी यतिराज यांना मारहाण करत असल्याचे त्यांना समजले. तेव्हा प्रतिभा यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी आकाश तेथून जाऊन त्याच्या घरातून कु-हाड आणली. त्या कु-हाडीने यतिराजच्या डोक्यात जोराचा वार केला. यात रक्तस्त्राव होऊ लागल्याने यतिराज यांना शासकीय रग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान विजापूर नाका पोलिसांनी पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. सोमवारी या घटनेचा निवेदन पंचनामा करावयाचा असल्याने पोलिसांनी आरोपींना घटनास्थळ तसेच हत्यार कोठे लपवलेल्याच्या ठिकाण नेत असताना आयटीआय पोलीस चौकीसमोरच अचानक पोलिसांची गाडी बंद पडली. यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला. परंतु पोलिसांनी त्यातून मार्ग काढला आणि आरोपींना रस्त्यावरून पायी चालत नेले. हा प्रकार पाहून रस्त्यावर बघ्यांची दुतर्फा मोठी गर्दी जमा झाली होती. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी झाडात लपवलेली कु-हाड पोलिसांना काढून दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक सुहास वराळे यांच्यासह विजापूर नाका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
गाडी बंद पडल्याने पायी नेले….
खुनाच्या संशयित गुन्हयातील आरोपींना निवेदन पंचनामा करण्यासाठी गाडीतून नेण्यात येत होते. परंतु रस्त्यावरून जाताना अचानक गाडी बंद पडली. यानंतर आरोपींना रस्त्यावरून पायी चालत नेले. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कु-हाड काढून पोलिसांना दिली.
दादा गायकवाड,
पोलीस निरीक्षक, विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर