पुणे – देशात तरूणांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तरूण पिढी ही आपल्या देशाची ताकद असून त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच केंद्र सरकार कार्यरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
पुण्यात टपाल विभागाच्या वतीने आयोजित 17व्या रोजगार मेळाव्यात श्री. मोहोळ बोलत होते. आज केंद्र सरकार तर्फे देशभरात 40 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे एकाचवेळी आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून देशभरातील सुमारे 51 हजार तरूणांना आज नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवनियुक्त उमेदवारांशी संवाद साधला व संबोधित केले. याचाच एक भाग म्हणून पुण्यात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर मोहोळ होते. तर याप्रसंगी भारतीय टपाल सेवेतील पुणे विभाग संचालक अभिजित बनसोडे उपस्थित होते.
या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या टपाल विभागासह भारतीय रेल्वे, सीमा सुरक्षा बल, सीजीएसटी आणि कस्टम, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ), सशस्त्र सीमा बल, भारतीय विमानतळ प्राधीकरण, केंद्रीय राखीव पोलीस बल तसेच जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आदी विभागांमधील तब्बल 103 उमेदवारांना मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मुरलीधर मोहोळ यांनी केंद्र सरकार तरुणांसाठी करत असलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, गेल्या दहा वर्षात देशातील असंख्य तरूणांना केंद्र सरकारच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. गुणवत्ता पूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आदी धोरणांमुळे अनेक क्षेत्रात तरुणांना रोजगार मिळू लागले असून, सर्व समावेशक विकास या उद्देशाने केंद्र सरकार कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये तरूण पिढीला सामावून घेणे हा रोजगार मेळाव्यांचा उद्देश आहे. या माध्यमातून आजपर्यंत 10 लाखांहून अधिक उमेदवारांना नोकरी देण्यात आली, याचा आनंद वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शैक्षणिक दृष्टिकोनातूनही योग्य दिशेने काम करत आहे. गेल्या 10 वर्षात देशात 760 विद्यापीठे होती. आज देशात 1334 विद्यापीठे तयार झाली आहेत. आयआयटींची संख्या वाढून 23 झाली आहे. केवळ शिक्षण-नोकरीच नव्हे तर आत्मनिर्भर भारतासाठी उद्योग उभारणीचे कामही अत्यंत वेगाने करण्यात येत आहे, लघु उद्योगासाठी 36 लाख कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. आजघडीला देशातील 50 टक्के नागरिक केंद्र सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनांचा लाभ घेत असून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत, असे ते म्हणाले.
***



















