किनवट / नांदेड : कृषि उत्पन्न बाजार समिती, किनवटचे सभापती गजानन गोविंदराव मुंडे यांनी राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांना सविस्तर निवेदन देत वखार महामंडळाच्या किनवट-वाई (बा.) गोदामातील मोठ्या गैरव्यवहारां विषयी माहिती देऊन तातडीने चौकशीची मागणी केली आहे. सभापती मुंडे यांनी आपल्या अधिकृत लेटरहेडवर पाठविलेल्या तक्रारीत या दोन्ही ठीकाणी कार्यरत व प्रभारी गोदामपाल अर्जुन शंकरराव भांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोपांची मालिका उघड केली आहे.
तक्रारीनुसार, अर्जुन भांगे हे सात–आठ वर्षांपासून किनवट व वाई (बा.) गोदामात कार्यरत असून त्यांनी रुजू झाल्यानंतर सर्वप्रथम जुने वॉचमन कामावरून कमी केले. कंत्राटदार कंपनीशी संगनमत करून स्वतःचे नातेवाईक नामदेव इंगोले तसेच गावातील सतीश कांबळे यांची वॉचमन म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.
सभापती मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, गोदामपाल भांगे यांनी खरेदी केंद्रांवर 51 किलोची शासकीय अट सांगून अधिक सोयाबीन उचलून ठेवली, पण शेतकऱ्यांना कमी पावती देऊन उरलेला माल रात्रीच्या वेळी 300 ते 500 क्विंटलपर्यंत विक्री केल्याचा गंभीर आरोप आहे. ही विक्री त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून केल्याचेही पत्रात नमूद आहे.
तक्रारीनुसार, भांगे यांनी NCCF खरेदी केंद्रांवर “रिझेक्ट करण्याचे अधिकार” वापरण्याची धमकी देऊन दर क्विंटल 10 रुपये वसुली करून लाखो रुपयांची उघड उघड वसुली केली.
किनवट व शनिवारपेठ गोदामातील तूर खरेदीतही गंभीर गैरव्यवहार झाल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. तूर निकृष्ट व जुनी असूनही गोदामात जमा केल्याची, तसेच 51 किलो प्रमाणे माल ठेवून शेतकऱ्यांना कमी पावती देऊन उरलेला माल बाजारात विकण्यात आल्याची माहिती सभापती मुंडे यांनी मांडली आहे.
या सर्व गैरव्यवहारांकडे वरिष्ठांच्या डोळ्यासमोरून दुर्लक्ष होत असल्याचा उल्लेखही तक्रारीत असून, गोदामपाल भांगे हे दरवर्षी वरिष्ठ अधिकाऱ्यांना हप्ते देतात, त्यामुळे त्यांची बदली होत नाही, असा गंभीर आरोप सभापती मुंडे यांनी केला आहे. शासनाच्या नियमांनुसार तीन वर्षांनी बदली आवश्यक असते, तरीही त्यांचीच नेमणूक कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभापती मुंडे यांनी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून गोदामपाल अर्जुन भांगे यांना तात्काळ निलंबित करण्याची तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी पणनमंत्री रावल यांच्याकडे केली आहे. तसेच किनवट–वाई गोदामासाठी नवीन गोदामपालाची नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा स्वतःला उपोषण आणि आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे.
या तक्रारीची प्रत पणन संचालक, वखार महामंडळ पुणे, विभागीय व्यवस्थापक लातूर, छ. संभाजीनगर विभाग तसेच नांदेड येथील संबंधित कार्यालयांना पाठविण्यात आली आहे. या तक्रारीमुळे वखार महामंडळातील भ्रष्टाचाराचे पुन्हा एकदा पडसाद उमटले असून, या गंभीर आरोपांची राज्य शासनाकडून पुढील कारवाई काय होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वरिल आरोपा संदर्भात वखार महामंडळाचे गोदामपाल अर्जुन शंकरराव भांगे यांच्या ९९६०४४०९३३ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधत प्रतिक्रीया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
























