बार्शी : व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल जितके आवश्यक आहे, तितकेच व्यवसायास लागू होणाऱ्या कायद्यांचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माननीय अॅड. रणजीत काजळे यांनी केले.
बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी व अंतर्गत मूल्यमापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता विकास उपक्रमाच्या चौथ्या दिवशी “उद्योजकता आणि व्यवसाय कायदा” या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. आपल्या मार्गदर्शनात अॅड. रणजित काजळे यांनी विद्यार्थ्यांना केवळ कायद्याची तांत्रिक भाषा न सांगता, व्यवसाय सुरू करताना कोणते कायदे लागू होतात, कायदे पाळल्यास व न पाळल्यास काय परिणाम होतात, याची सखोल व उदाहरणांसहित माहिती दिली.
त्यांनी विशेषतः कंपनी कायदा, ग्राहक संरक्षण कायदा तसेच इतर व्यावसायिक कायद्यांची माहिती देत, व्यवसाय करताना कायद्याचे पालन केल्याने होणारे फायदे स्पष्ट केले. आपल्या प्रत्यक्ष अनुभवातील काही प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी कायद्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनीही हे मार्गदर्शन मनोभावे ऐकून घेतले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. डी. लांडे, वाणिज्य विभाग प्रमुख के. बी. चपटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता चव्हाण यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रियंका गायकवाड यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन साक्षी माने यांनी केले.
उद्योजकता विकासाच्या या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत असून, चौथ्या दिवशी व्यवसाय विषयक कायद्यांवर झालेले सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या भावी उद्योजकीय वाटचालीस नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे.
























