पंढरपूर – ‘महाविद्यालयाची प्रगती ही सर्वस्वी विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अवलंबून आहे आणि विद्यार्थी प्रगत झाला तर शिक्षकांची खरी प्रगती होत असते. यासाठी शिक्षकांनी देखील प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे प्र.कुलगुरु डॉ.लक्ष्मीकांत दामा यांनी केले.
येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘ऋणानुबंध २०२५’ हा माजी विद्यार्थी मेळावा व २०२५ च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘पदवीप्रदान सोहळा’ हे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात प्र.कुलगुरु डॉ.लक्ष्मीकांत दामा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सुरवातीला प्रा. अविनाश मोटे यांनी ‘माजी विद्यार्थी असोसिएशनचा लेखा-जोखा मांडला. माजी विद्यार्थी मेळाव्याला २००३ च्या बॅचचे माजी विद्यार्थी विजयकुमार भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. स्वेरीच्या २००३ च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी व ‘एमफासेस’ या कंपनीच्या मृणाल पाटील ह्या देखील उपस्थित होत्या. पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांंना आपल्या जबाबदारीची जाणीव राहावी यासाठी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. शपथ पत्राचे वाचन प्र.कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले. ‘ऋणानुबंध २०२५’ या माजी विद्यार्थी मेळाव्याला देशभरात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या स्वेरीच्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी प्रमुख पाहुणे विजयकुमार भोसले म्हणाले कि, ‘करिअर करण्यापूर्वी आपण जे शिक्षण घेता त्यात क्वालिटी असावी. आपण किती काम करता यापेक्षा आपण किती गुणवत्तापूर्ण कार्य करता हे महत्वाचे असते. म्हणून आपल्या कामात एकाग्रता आणि गुणवत्ता असावी.’ असे सांगून जागतिक बाजारपेठेत कंपन्यांचे स्थान काय असते हे स्पष्ट केले.
यावेळी यशस्वी स्वेरीचे माजी विद्यार्थी तथा यशस्वी उद्योजक असलेले सुभाष काकडे यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी ॲल्युमिनी असोसिएशनच्या वतीने महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
पदवीप्रदान समारंभ प्रसंगी इमारतीच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य रंगमंचापर्यंत परीक्षा विभागाचे स्वेरीचे नियंत्रक डॉ.एस.ए.लेंडवे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानदंडाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये सर्व मान्यवर, संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी, इंजिनिअरिंग व फार्मसीचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, पदवीधर व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी ॲल्युमिनी असोसिएशनचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर, एचसीएल कंपनीचे डॉ. योगीराज दामा, संस्थेचे सचिव डॉ. सुरज रोंगे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.पी.एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरीचे परीक्षा नियंत्रक डॉ.सतीश लेंडवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके यांनी आभार मानले.

























